साहेबराव नरसाळे, अहमदनगरमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावून जळगावचा विजय चौधरी ४१वा महाराष्ट्र केसरी ठरला़ विजयच्या रूपाने जळगावला केसरी किताबाचा सन्मान मिळाला़, तर पुण्याचा सचिन येलभरला उपमहाराष्ट्र किताबावर समाधान मानावे लागले़वाडिया पार्क क्रीडा संकुलात महाराष्ट्र केसरी किताबासाठी आज, रविवारी सायंकाळी जळगावचा विजय चौधरी व पुण्याचा सचिन येलभर यांच्यामध्ये लढत झाली़ दोघेही ताकदीचे पैलवान आखाड्यात उतरताच प्रचंड जनसमुदायाने शिट्ट्या व टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले़ पंचांनी इशारा देताच विजयने एकेरी पट काढून एका गुणाने खाते उघडले़ पंचांनी एका गुणाचा इशारा करताच क्षणाचाही विलंब न करता विजयने पुन्हा भारंदाज लावून दोन गुणांची कमाई केली़ काही सेकंदांतच तीन गुणांची आघाडी घेतलेला विजय, तर प्रारंभीच पिछाडीवर गेलेला सचिन अशा दोघांनीही बचावात्मक पावित्रा घेतला़ मध्यंतराला विजयने तीन गुणांची आघाडी घेतली होती, तर सचिनला एकही गुण मिळाला नाही़विश्रातीनंतर विजयचा दुहेरी पट काढण्याचा प्रयत्न सचिनने धुडकावला; मात्र सचिन गादीच्या बाहेर गेल्यामुळे विजयच्या खात्यात एक गुण जमा झाला़ त्यानंतर पंचांनी ताकीद देऊनही विजयने सकारात्मक खेळ न केल्यामुळे पंचांनी सचिनला एक गुण बहाल केला़ या गुणाबरोबर सचिनचे खाते उघडले़ सचिनचा एकेरी पटाचा प्रयत्न विजयने धुडकावताच पुन्हा सचिनने भारंदाज लावून दोन गुणांची कमाई केल्याने सचिनच्या खात्यावर तीन गुण, तर विजयच्या खात्यावर चार गुण होते. निर्धारित वेळ संपली आणि पंचांनी विजयला महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी घोषित केले़ गृहराज्यमंत्री राम शिंदे व आॅलिम्पिकवीर सुशीलकुमार यांच्या हस्ते विजय चौधरी याला मानाची गदा देण्यात आली.
जळगावच्या विजय चौधरीला महाराष्ट्र केसरीचा बहुमान
By admin | Published: December 29, 2014 4:48 AM