- अमोल मचाले
पुणे : खो-खोमध्ये खेलो इंडिया यूथ गेम्समधील सर्वच्या सर्व म्हणजे चारही सुवर्णपदके जिंकण्याची संधी महाराष्ट्राला आहे. बुधवारी महाराष्ट्राच्या संघांनी १७ तसेच २१ वर्षांखालील मुलांच्या तसेच मुलींच्या गटातून अपेक्षेप्रमाणे अंतिम फेरीत धडक दिली.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरु असलेल्या या स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या उपांत्य सामन्यात महाराष्ट्राने तमिळनाडूवर १२-६ असा १ डाव ६ गुणांनी विजय मिळवला. रोहन कोरे (३.३० मिनिटे व १ गुण), विजय शिंदे (२.५० मिनिटे व २ गुण), दिलीप खांडवी (नाबाद २.४० मिनिटे), कर्णधार चंदू चावरे (२ मिनिटे, ३ गुण), विशाल दुकळे (२.४० मिनिटे, २ गुण) व ऋषिकेश शिंदे (२ मिनिटे व २ गुण) हे महाराष्ट्राच्या विजयाचे शिल्पकार ठरले. गुरुवारी अंतिम फेरीत महाराष्ट्रसमोर आंध्रप्रदेशचे आव्हान असेल.मुलींच्या उपांत्य लढतीत महाराष्ट्राने पंजाबचा ७-६ असा १ गुण आणि ५ मिनिटांनी पराभूत केले. महाराष्ट्राच्या श्रुती शिंदे (दोन्ही डावांत ३ मिनिटे), अश्विनी मोरे (२.४० व २.३० मिनिटे), हर्षदा पाटील (२ गुण), किरण शिंदे (२.२० व ३.२० मिनिटे) व दिक्षा सोनसुरकर (नाबाद १ मिनिट व १ गुण) यांनी वर्चस्व गाजवले. पंजाबकडून कमलजीत कौर, हरमनप्रीत कौर व रमणदीप कौर यांनी चांगली झुंज दिली.
२१ वर्षांखालील मुलांच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्राने गुजरातचे आव्हान १३-९ असे १ डाव आणि ४ गुणांनी परतावले. त्याचप्रमाणे, मुलींच्या गटातही महाराष्ट्राने जोरदार खेळ कायम राखत सुवर्ण पदकाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले. उपांत्य फेरीत यजमानांनी ओडीशाचा १०-७ असा १ डाव आणि ३ गुणांनी पराभव केला.
टेनिसमध्ये आर्यनची कूचटेनिसमध्ये १७ वर्षांखालील मुलांच्या गटात आर्यन भाटिया याने चुरशीच्या उपांत्य फेरीत अव्वल मानांकित हरियाणाच्या सुशांत दबस याचे आव्हान ७-५, ३-६, ६-२ असे संपवले. सामन्यात १-१ अशी बरोबरी असताना निर्णायक सेटमध्ये प्रभावी सर्व्हिस, नेटजवळील सुरेख खेळ आणि पॉवरफुल फोरहँड फटक्यांच्या जोरावर ६-२ने सहज सरशी साधत आर्यनने बाजी मारली. मिहिकाने २१ वर्षांखालील गटाच्या उपांत्य लढतीते उत्तर प्रदेशच्या काव्या सावनी हिचा ६-३, ६-३ असा सहज पराभव केला. १७ वर्षांखालील मुलींच्या गटातून प्रेरणा विचारे आणि गार्गी पवार यांनी विजयी वाटचाल केली. प्रेरणाने चुरशीच्या झालेल्या सामन्यात तामिळनाडूच्या एस. पंडितरा हिचा ४-६, ६-३, ७-६(७-५) असा पाडाव केला. त्याचवेळी, गार्गीने हरियाणाच्या अंजलीराठीचा ६-२, ६-७(४-७), ६-३ असा पराभव केला.