गुवाहाटी येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया २०२० स्पर्धेत पदकांचे शतक साजरं करण्याचा मान महाराष्ट्राने सर्वप्रथम पटकावला आहे. यात कोल्हापूरच्या एका खेळाडूनं पदकांचा नुसता 'धुरळा' उडवला आहे. या स्पर्धेत तिनं चार सुवर्ण आणि एक कांस्यपदक पटकावलं आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेली, त्यामुळेच संकटासमोर न खचता लढण्याचे बाळकडू लहानपणीच प्यायलेल्या पूजा दानोळेनं गुवाहाटीत आपला दबदबा दाखवून दिला आहे.
दमदार कामगिरी करण्याच्या आत्मविश्वासानेच पूजा या स्पर्धेत सायकलिंग ट्रॅकवर उतरली होती. पण आपण राष्ट्रीय विक्रम मोडू शकू का, याबद्दल मनात जरा शंकाच होती, असं मूळच्या इंगळी गावातील पूजानं सांगितलं. सुरुवातीपासून स्विमिंगची ( जलतरण) आवड असलेली पूजा अपघातानं सायकलिंगमध्ये आली. शाळेत असताना सायकलशी संबंध केवळ ट्रायथलॉन क्रीडा प्रकारापुरता यायचा. पण शाळेतील शिक्षकांनी पूजामध्ये असलेले टॅलेंट हेरलं आणि तिला सायकलिंग स्पर्धेसाठी बोलावलं.
त्या स्पर्धेत पडली नसती, तर आज ती या खेळात नसती!पहिल्याच जिल्हास्तरीय सायकलिंग स्पर्धेत सहभागी झालेल्या पूजानं तिसरं स्थान पटकावलं. तिनं सांगितलं, "ट्रायथलॉन पुरती मी सायकलिंग करायची. पण शाळेतील शिक्षकांनी मला जिल्हास्तरीय स्पर्धेत भाग घेण्यास सांगितलं. स्पर्धेत एका वळणावर मी पडले. पण, त्यानंतर जिद्दीने उभी राहताना तिसरं स्थान पटकावलं. त्याचवेळी पुढच्याचवर्षी ही स्पर्धा जिंकण्याचा निर्धार केला आणि सायकलिंगची सुरुवात केली. पुढील वर्षी स्पर्धा जिंकून मला दीपाली पाटील मॅडमनी बालेवाडीत प्रवेश घेण्यास सांगितले. तिथून सायकलिंगचा प्रवास सुरू झाला."
पूजानं पहिल्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेत केवळ सहभाग घेतला होता. तेव्हा तिनं या खेळाचे बारकावे जाणून घेतले. त्यानंतर पुढील स्पर्धेत पदकांची लयलूट केली. त्यामुळे तिला राष्ट्रीय कॅम्पसाठी दिल्लीत भारतीय क्रीडा प्राधिकरणात बोलावणे आले. मागील चार वर्षांपासून ती सायकलिंग करत आहे. कोल्हापूरमध्ये पूजा दररोज २५-२५ किलोमीटर सायकलिंग करून सराव करायची. वडील आणि मोठा भाऊ दोघेही खेळाडू असल्यानं त्यांच्याकडूनही तिला प्रोत्साहन मिळालं.
पूजाचे वडील बबन दानोळे हे माजी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आहेत, तर भाऊ हर्षद हाही राष्ट्रीय पदकविजेता कुस्तीपटू आहे. त्यामुळे घरातून प्रोत्साहन मिळतच होतं. पण, या क्षेत्राशी संबंध नसतानाही पूजाची आई अर्चना यांचा या यशात खारीचा वाटा आहे. अपयश आले तरी खचू नकोस, प्रयत्न करत रहा, एकदिवस यश नक्की मिळेल, हे आई सतत सांगते आणि त्यामुळेच मला संघर्ष करण्याची ताकद मिळते, असं पूजाने सांगितले.
सायकलिंग हा महागडा खेळ. त्यामुळे शेतकरी कुटुंबाला तो परवडणं शक्य नाही. पण, मुलीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वडिलांनी कर्ज काढलं आहे. पूजाच्या यशानं त्या कर्जाचं ऋण फेडल्याची भावना नक्की वडिलांच्या मनात असेल. शेतीसोबतच पूजाचे वडील खासगी बँकेत क्लार्क म्हणून कामाला आहेत. पूजाच्या स्वप्नासाठी त्यांनी जवळपास पाच लाखांचं कर्ज काढलं आहे.
खाशाबा जाधवांसारखा पराक्रम करायचाय!
भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत पहिले वैयक्तिक पदक जिंकून देण्याचा मान हा महाराष्ट्राच्या कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या नावावर आहे. तसाच मान पूजाला पटकवायचा आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत सायकलिंगमध्ये भारताचे पहिले प्रतिनिधित्व आणि पहिले पदक तिला जिंकायचे आहे. २०२४ ऑलिम्पिक स्पर्धेच्या दृष्टीने तयारीही सुरू केल्याचे तिने सांगितले. आता अकरावीत असलेल्या पूजाला पदवीधर अभ्यास पूर्ण करून आयपीएस अधिकारीही बनायचे आहे.
आसामच्या मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या पूजाचे कौतुकमहाराष्ट्राच्या पूजाने तीन सुवर्णपदके मिळविल्याचे समजल्यावर सोनोवाल यांनी आसामचे मुख्यमंत्री सवार्नंद सोनोवाल यांनी कौतुक केले. महाराष्ट्रातून कुठून आलीस, घरी कोण आहे, आई वडिल काय करतात असे विचारल्यावर त्यांनी तुझ्याबरोबर आई वडिलांचेही अभिनंदन करायला हवे आणि भेटल्यावर त्यांना माझा नमस्कार सांग असेही त्यांनी सांगितले