ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 02 - नागपूरच्या वैष्णवी भालेने नागपूरच्याच मृण्मयी साओजीचा पराभव करत पहिल्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ बॅडमिंटन निवड चाचणी अजिंक्यपद स्पर्धेत महिला एकेरी गटातील अंतिम फेरीत प्रवेश केला. तर दुस-या बाजूला पुण्याच्या श्रृती मुंदडाने नाशिकच्या वैदेही चौधरीचा 2-0 असा धुव्वा उडवत अंतिम फेरी गाठली. स्पर्धेत महिला एकेरी अजिंक्यपदासाठी वैष्णवी विरुद्ध मृण्मयी असा सामना शनिवारी (2 जुलै) रंगणार आहे.
महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेने स्पोर्ट्स युनायटेडच्या वतीने निवड चाचणी अजिंक्यपद स्पर्धेचे सामने आयोजित करण्यात आले आहे. चेंबूर जिमखाना बॅडमिंटन कोर्टावर झालेल्या उपांत्य सामन्यात वैष्णवीला मृण्मयीने पहिल्या सेटमध्ये कडवी झुंज दिली. मृण्मयीने सेटवर वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला. मात्र मोक्याची वेळी वैष्णवीने खेळ उंचावत 21-19 असा सेट आपल्या नावे केला. दुस:या सेटमध्ये मात्र मृण्मयीच्या खेळामध्ये काहीअंशी निराशा जाणवत होती. त्यातच वैष्णवीने आपला दमदार खेळ सुरु ठेवत सामना 21-19, 21-14 जिंकून अंतिम फेरीत शानदार प्रवेश केला.
दुस-या उपांत्य सामन्यात पुणोकर श्रृतीने नाशिककर वैदेहीवर 21-9, 21-9 असे सहज नमवत अंतिम फेरी गाठली. श्रृतीने पहिल्या सेट पासून सामन्यावर पकड मिळवत वैदेहीला प्रतिकार करण्याची संधीच दिली नाही. परिणामी दोन्ही सेटमध्ये वैदेहीने निर्विवाद विजय मिळवला.
पुरुष एकेरीमध्ये पुण्याच्या अमेय ओकने मुंबईच्या सुशांत करमरकरवर 14-21, 21-18, 22-20 अशी मात केली. मुंबईच्या सुशांतने सामन्याला आक्रमक सुरुवात केली. पहिल्या सेटमध्ये निर्णायक आघाडी घेत सेटमध्ये 21-14 असा विजय मिळवला. मात्र दुस:याच सेटमध्ये अमेयने यशस्वी पुनरागमन करत (21-18) केले. 1-1 अशा बरोबरीनंतर अमेय-सुशांतने विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले पण अवघ्या दोन गुणांनी अमेयने बाजी मारत (22-2क्) सुशांतचे आव्हान संपुष्टात आणले. पुरुष एकेरी अजिंक्यपदासाठी अमेय आणि बृहन्मुंबईचा निगेल डिसिल्व्हा आमने-सामने येणार आहे.
अन्य निकाल :
महिला दुहेरी :
मानसी गाडगीळ-वैष्णवी अय्यर वि.वि मृण्मयी साओजी-सिमरन सिंघी 23-21, 21-17
वैष्णवी भाले-श्रृती मुंदडा वि.वि. ऐश्वर्या नारायणमुर्ती-वरदा दिक्षीत 21-17, 21-05
मिश्र दुहेरी :
निशाद द्रविड-मानसी गाडगीळ वि.वि. विपलव कुवाळे-अक्षया वारंग 21-12, 21-15
समीर भागवत-गौरी घाटे वि.वि. गोविंद सहस्त्रबुद्धे-वैष्णवी भाले 21-13, 22-20