गोल्ड कोस्ट : मल्लांनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी करताना २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या सुवर्णपदक पटकावण्याच्या मोहिमेत आज आपले योगदान दिले, तर नेमबाजी व मैदानी स्पर्धेतही भारताच्या पदरात काही पदकांची भर पडली. सुशील कुमारने सहज सुवर्णपदक पटकावले, तर सीमा पूनियाने महिला थाळीफेकमध्ये रौप्यपदक पटकावताना मैदानी स्पर्धेत भारताचे खाते उघडले. माजी विश्व चॅम्पियन तेजस्विनी सावंतने नेमबाजीमध्ये रौप्यपदक पटकावले.भारताने आज एकूण २ सुवर्ण, तीन रौप्य व एक कांस्यपदक पटकावले. भारताने पदक तालिकेत आॅस्ट्रेलिया व इंग्लंडनंतर तिसरे स्थान कायम राखले आहे. भारताच्या नावावर आता १४ सुवर्ण, ७ रौप्य व १० कांस्यपदकांची नोंद आहे. दिवसाची सुरुवात ब्रिस्बेनमध्ये बेलमोंट शूटिंग सेंटरमध्ये सावंतच्या रौप्यपदकाने झाली. तिने महिलांच्या ५० मीटर रायफल प्रोनमध्ये हे पदक पटकावले. त्यानंतर करारा स्पोर्ट््स अँड लीजर सेंटरमध्ये कुस्तीत भारतीय मल्लांनी छाप सोडताना २ सुवर्ण, १ रौप्य व १ कांस्यपदक पटकावले.विद्यमान चॅम्पियन सुशीलने (७४ किलो) मॅटवर अधिक वेळ घालविला नाही. दक्षिण आफ्रिकेच्या जोहानेस बोथाविरुद्ध अंतिम लढत त्याने केवळ २० सेकंदामध्ये संपविली. त्याने सहज विजय मिळवताना सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावले. राष्ट्रुकल स्पर्धेत तीन सुवर्णपदक पटकावणारा तो पहिला भारतीय मल्ल ठरला.राहुल आवारे (५७ किलो) यानेही सुवर्णपदक पटकावले. अनेकदा त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, पण या वेळी संधी मिळाल्यानंतर त्याने छाप सोडली. त्याने अंतिम फेरीत कॅनडाच्या स्टीव्हन तकाहाशीचा पराभव केला. विद्यमान चॅम्पियन बबिता फोगाटला (५३ किलो) मात्र कांस्यपदकावर समाधान मानावे लागले, तर किरणने ७६ किलो गटात कांस्यपदकाचा मान मिळवला. सायंकाळच्या सत्रात सीमा पूनिया व नवजित कौर ढिल्लो यांनी महिलांच्या थाळीफेक स्पर्धेत अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक पटकावताना भारताला मैदानी स्पर्धेत पदकांचे खाते उघडून दिले. बॅडमिंटनमध्ये भारतासाठी अनुकूल निकाल मिळाले. सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू आणि के. श्रीकांत यांनी सहज विजयाची नोंद करीत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले.टेबल टेनिस व स्क्वॉशमध्येही भारतीय खेळाडूंनी अपेक्षित यश मिळवताना पदकाची आशा कायम राखली. भारतीय महिला हॉकी संघाने मात्र निराश केले. उपांत्य फेरीत भारताला आॅस्ट्रेलियाविरुद्ध १-० ने पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे भारत सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला. भारतीय संघाला आता कांस्यपदकासाठी इंग्लंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. इंग्लंडला पेनल्टी शूटआऊटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. (वृत्तसंस्था)>स्वप्न साकार झाले...दहा वर्षांपासून पदकाच्या प्रतीक्षेत होतो. आता काय भावना आहेत त्या शब्दांत व्यक्त करू शकत नाही. २०१० मध्ये पदकापासून वंचित रािहलो तर २०१४ मध्ये ट्रायल न घेताच संघ तयार झाला होता. अखेर स्वप्न साकार झाल्याचे समाधान आहे. २०१२ मध्ये माझे गुरू रुस्तम-ए-हिंद हरिश्चंद्र बिराजदार यांचे निधन झाले; हे पदक त्यांना समर्पित करतो.- राहुल आवारे, सुवर्णविजेता मल्ल.>राष्ट्रकुल स्पर्धेत ज्या प्रकारे राहुलने लढती केल्या आहेत त्याला तोड नाही. अंतिम सामन्यामध्ये तो जरा कमी पडला होता; पण नंतर त्याने आक्रमक खेळ करून आणि योग्य ते डाव खेळून गुण भरून काढले. बिराजदार मामा आणि माझी राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याची इच्छा त्याने पूर्ण केली आहे. त्याने गेल्या ६ महिन्यांपासून घेतलेल्या अपार कष्टांना योग्य न्याय मिळाला आहे. बीड येथील पटोडासारख्या खेडेगावातून राहुल कुस्तीसाठी प्रथम बिराजदार मामांकडे आणि नंतर माझ्याकडे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात सरावासाठी आला. गेल्या १० वर्षांपासून सराव करत असताना त्याचे स्वप्न आहे की, राष्ट्रकुलनंतर आशियाई आणि आॅलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकून महाराष्ट्राचे नाव लौकिक करायचे. - अर्जुनवीर काका पवार, राहुलचे मार्गदर्शक>तिकिटाअभावी बबिताच्या लढतीस वडील महावीर फोगाट मुकलेबबिता फोगाटने राष्टÑकुल कुस्तीचे सुवर्णपदक जिंकले. तिची लढत पाहण्यास उत्सुक असलेले वडील महावीर फोगाट यांना स्पर्धास्थळाचे तिकीट नसल्याने उपस्थित राहता आले नाही. पदक मिळाल्यानंतर बबिताने ही माहिती दिली. ती म्हणाली,‘ माझे वडील पहिल्यांदा इतक्या दूर माझी कुस्ती पाहण्यासाठी आले होते; पण तिकीट न मिळाल्याने त्यांना बाहेरच ताटकळावे लागले. त्यांना माझा सामना टीव्हीवरही पाहता आला नाही. एका खेळाडूला दोन तिकिटे दिली जातात; पण आम्हाला तीदेखील मिळाली नाहीत. सामना संपल्यानंतर आॅस्ट्रेलियाच्या कुस्ती टीमने महावीर यांना दोन तिकिटे दिली, तेव्हा कुठे ते आत प्रवेश करू शकले. त्याआधी आयओएच्या अधिकाºयाकडे तिकिटासाठी विनवणी करूनही मला वडिलांसाठी तिकीट उपलब्ध करता आले नाही, अशी खंत बबिताने व्यक्त केली. यावर भारतीय पथक प्रमुख विक्रम सिसोदिया म्हणाले, ‘मल्लांसाठी जी तिकिटे होती ती सर्व कोच राजीव तोमर यांच्याकडे सोपविली होती. मल्लांमध्ये वितरित करण्याची जबाबदारी त्यांची होती.’सायना नेहवालच्या वडिलांना अॅक्रिडेशन नाकारताच या स्टार खेळाडूने बॅडमिंटनमधून माघार घेण्याची धमकी दिली होती.>नेमबाजीत तेजस्विनी सावंतला रौप्यअनुभवी नेमबाज तेजस्विनी सावंत हिने उत्कृष्ट कामगिरी करीत २१ व्या राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेच्या महिला गटात ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात रौप्यपदक जिंकले. राष्टÑकुल स्पर्धेतील तेजस्विनीचे हे एकूण सहावे पदक आहे. तिने ६१८.९ गुणांची कमाई केली. भारताची खेळाडू अंजुम मुद्रल ६०२.२ गुणांसह १६व्या स्थानावर राहिली.>थाळीफेकीत सीमाला रौप्य, नवजितला कांस्यसीमा पुनिया आणि नवजित कौर ढिल्लो यांनी राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेच्या अॅथ्लेटिक्समध्ये महिला थाळीफेकीत क्रमश: रौप्य आणि कांस्यपदक जिंकले. सीमाने ६०.१४ मीटर थाळीफेक करीत चौथे राष्टÑकुल पदक जिंकले. नवजितने अखेरच्या प्रयत्नात ५७.४३ मीटरसह कांस्य पटकावले.>माझे लक्ष्य टोकियो आॅलिम्पिक आहे. मात्र त्याआधी जकार्ता येथे आशियाड आणि त्यानंतर द. कोरियात होणाºया विश्व चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकण्याचा निर्धार कायम आहे. आजची कामगिरी चांगलीच झाली. मी आनंदी आहे.- तेजस्विनी सावंत, रौप्यविजेती नेमबाज.
महाराष्ट्राच्या राहुलने गाजविले राष्ट्रकुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 4:37 AM