आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये भारतीय शिलेदारांनी विक्रमी पदकांची कमाई केली. काही खेळाडूंनी कडवी झुंज दिली पण त्यांना पदक जिंकण्यात अपयश आलं. नाशिकच्या सर्वेश कुशारेला देखील पदक जिंकण्यात अपयश आलं असलं तर या मराठमोळ्या पठ्ठ्याने चौथ्या स्थानावर झेप घेतली. खरं तर सर्वेशला थोड्या फरकामुळे कांस्य पदकापासून दूर राहावे लागले. पुरूषांच्या उंडी उडी स्पर्धेत सर्वेशने २.२६ मीटर उडी मारली.
दरम्यान, कतारच्या BARSHIM Mutazने २.३५ मीटरसह सुवर्ण पदकाला गवसणी घातली. याशिवाय कोरियाच्या WOO Sanghyeokने २.३३ मीटरसह रौप्य आणि जपानच्या SHINNO Tomohiroने २.२९ मीटरसह कांस्य पदक पटकावले. त्यामुळे महाराष्ट्राच्या शिलेदाराला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. सर्वेश कुशारे हा मूळचा महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील आहे. नाशिकपासून ३० किमी अंतरावर असलेल्या देवरगाव गावच्या सर्वेशने आशियाई स्पर्धेपर्यंत झेप घेतली.
भारताची विक्रमी कामगिरी भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये विक्रमी पदकांची कमाई केली. भारताने आतापर्यंत ८१ पदकं जिंकली आणि ही आशियाई स्पर्धेतील भारताची आतापर्यंतची सर्वाधिक पदकं ठरली. आज नीरज चोप्राने भालाफेकीतील त्याचे जेतेपद कायम राखले. त्याने ८८.८८ मीटर लांब (सर्वोत्तम कामगिरी) भालाफेकून सुवर्णपदक निश्चित केले. भारताच्या किशोर कुमार जेनाने ८७.५४ मीटरसह रौप्यपदकावर नाव कोरले. महिलांच्या ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत भारताने ३ मिनिटे २७.८५ सेकंदासह रौप्यपदक जिंकले. त्यानंतर पुरुषांनी ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदक जिंकले.