मुंबई : भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक पदक जिंकवून दिले ते महाराष्ट्राचे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी. पण सध्याच्या घडीला महाराष्ट्राच्या कुस्तीपटूंची दयनीय अवस्था पुन्हा एकदा सर्वांसमोर आली आहे. अयोध्येमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतून परतताना महाराष्ट्राच्या कुस्तीपटूंना चक्क रेल्वेमध्ये टॉयलेटच्या बाजूला बसून प्रवास करावा लागल्याची बाब पुढे आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या स्पर्धेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना विमानाचे तिकीट देण्यात आले होते, पण कुस्तीपटूंसाठी कोणीही वाली नसल्याचेच समोर आले आहे.
अयोध्येमध्ये नुकतीच राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धा संपल्यावर महाराष्ट्रातील खेळाडूंना पुण्यात परतायचे होते. पण महाराष्ट्राच्या कुस्तीपटूंना कुणीही साधे रेल्वेचे तिकीटही दिले नाही. त्यामुळे या कुस्तीपटूंना रेल्वेतील टॉयलेटच्या बाजूला बसून प्रवास करावा लागला. त्याचबरोबर महिला कुस्तीपटूंनाही महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने वाऱ्यावर सोडल्याचेच पाहायला मिळाले. कारण महिला कुस्तीपटूंना यावेळी आरक्षण नसलेल्या डब्यातून प्रवास करावा लागला.
केंद्र सरकारकडून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला खेळाडूंच्या प्रवासासाठी भत्ता दिला जातो. पण खेळाडूंना कुस्तीगीर परिषदेने एकही पैसा खेळाडूंना दिला नसल्याचेच समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या स्पर्धेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना विमानाचे तिकीट देण्यात आले होते, पण कुस्तीपटूंसाठी कोणीही वाली नसल्याचेच समोर आले आहे.