नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीचे व्यक्तिमत्त्व इतरांसाठी प्रेरणादायी आहे शिवाय त्याचे कर्तृत्व इतरांसाठी उदाहरण ठरावे असेच असल्याचे मत ‘द वॉल’ म्हणून ख्यातिप्राप्त असलेला माजी कर्णधार राहुल द्रविड याने बुधवारी व्यक्त केले.धोनीच्या निवृत्तीनंतर द्रविड म्हणाला, एखादी साहसी बाब करण्यासाठी तो मागेपुढे पाहात नसल्याने ‘उदाहरण सेट’ करणारा म्हणून ओळखला जातो. एका लहान गावातून आलेल्या या खेळाडूने टीम इंडियाचे नेतृत्व करणे आणि ९० कसोटी सामने खेळणे ही मोठी बाब आहे. लहान गावातील मुले नवे काही करायची इच्छा बळागत असतील तर त्यांनी धोनीपासून प्रेरणा घ्यावी.’धोनीच्या अचानक निवृत्तीवर आश्चर्यचकित झालेला द्रविड म्हणाला, ‘आॅस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेच्या मध्येच आणि एक सामना शिल्लक असताना त्याने निवृत्तीची घोषणा करणे हे धक्का देणारे आहे. आपल्या निर्णयाचा त्याने मालिकेनंतर फेरविचार करायला हवा. ’ भारताला पुढील सात-आठ महिने कसोटी सामने खेळायचे नाहीत.तो म्हणतो, ‘मालिका गमावली असल्याने धोनीची घोषणा योग्य म्हणावी लागेल. विराटला अखेरच्या कसोटीत नेतृत्व करण्याचा मार्ग त्याने मोकळा करून दिला. शिवाय रिद्धिमान साहा याला यष्टिरक्षक म्हणून पुढे येण्याची सुवर्ण संधी असेल. रेकॉर्ड पाहिल्यास धोनी सर्वांत यशस्वी कर्णधार आहे यात शंका नाही. पण गेल्या चार वर्षांत त्याच्यापुढे अनेक आव्हाने उभी होती. २० गडी बाद करणारे गोलंदाज संघात नसतील तर कर्णधाराच्या अडचणीत आणखीच भर पडते. धोनीसोबत हेच घडले. धोनी हा बचावात्मक कधीही नव्हता. जे शस्त्र उपलब्ध आहे त्याचा वापर करण्यात तो कधी मागेही राहिला नाही.’ (वृत्तसंस्था) मी धोनीच्या नेतृत्वात खेळण्याचा पुरेपूर आनंद लुटला. धोनी जे काम करीत नाही ते इतरांनाही करायला सांगत नाही ही त्याच्यातील चांगली बाब म्हणायला हवी. धोनीने आपल्या सहकाऱ्यांकडून नेहमीच आदर मिळविला आहे. -राहुल द्रविड
महेंद्रसिंह धोनी इतरांसाठी प्रेरणादायी : राहुल द्रविड
By admin | Published: December 31, 2014 11:45 PM