ऑनलाइन लोकमत
मेलबर्न, दि. ३० - टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार, कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी येथील चौथ्या कसोटीतही धोनी खेळणार नसून कर्णधारपदाची सूत्रे विराट कोहलीकडे सोपवण्यात आली आहेत. बीसीसीआयला पत्र लिहून त्याने निवृत्तीचा निर्णय कळवला आहे.
वन-डे तसेच टी-२० क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण कसोटीतून निवृत्ती घेत असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.
न्यूझीलंड व इंग्लंडपाठोपाठ ऑस्ट्रेलियातही भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीमुळे धोनीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीमधील पहिल्या सामन्यात दुखापतीमुळे धोनी खेळला नव्हता. तर दुस-या व तिस-या सामन्यातही त्याचा खेळ चांगला झाला नव्हता.
एकूण ९० कसोटी सामने खेळलेल्या धोनीने १४४ इनिंग्जमध्ये ४८७६ धावा केल्या, २२४ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने देशात तसेच परदेशातही अनेक सामने जिंकले. २००८ ते २०१४ या कालावधीत धोनीने कर्णधारपदाची धुरा सांभाळली. ६० सामन्यांपैकी २७ सामन्यांत भारताचा विजय तर १८ सामन्यात पराभव पत्करावा झाला आणि १५ सामने आनिर्णित राखण्यात संघाला यश मिळाले.
धोनीची कसोटी कारकीर्द :
मॅच - ९०
इनिंग्ज - १४४
रन्स - ४८७६
नाबाद - १६ वेळा
सर्वोच्च धावसंख्या - २२४
सरासरी - ३८.०९
शतके - ६
अर्धशतके - ३३
धोनीच्या कर्णधारपदाची कारकीर्द :
कालावधी - २००८ ते २०१४
सामने - ६०
विजय - २७
पराजय - १८
अनिर्णीत - १५