ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 16 - महेश माणगावकर आणि विक्रम मल्होत्रा या अनुक्रमे द्वितीय व तृतीय मानांकीत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ७३व्या राष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धेत चमकदार कामगिरी करताना पुरुषांच्या एकेरी गटाची उपांत्य फेरी गाठली. त्याचवेळी अव्वल मानांकीत आणि संभाव्य विजेत्या तामिळनाडूच्य सौरव घोषाल आणि हरींदरपाल सिंग संधू यांनीही अपेक्षित कामगिरीसह उपांत्य फेरीत प्रवेश केला.
मुंबईतील ओट्टर्स क्लब येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत विक्रमने झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना थरारक बाजी मारली. तामिळनाडूच्या कुश कुमार विरुध्द त्याला ५ सेटपर्यंत झुंजावे लागले. पहिले सेट जिंकून आघाडी घेतलेल्या विक्रमला यानंतर कुशने सलग दोन सेट जिंकून १-२ असे पिछाडीवर टाकले. यावेळी कुश बाजी मारणार असेच चित्र होते. मात्र विक्रमने मोक्याच्यावेळी खेळ उंचावताना सलग दोन सेटमध्ये बाजी मारुन ११-५, ८-११, १०-१२, ११-९, ११-७ असा शानदार विजय मिळवला.
दुसरीकडे महाराष्ट्राचा अव्वल खेळाडू महेशने आक्रमक खेळाच्या जोरावर सहज उपांत्य फेरी गाठताना तामिळनाडूच्या वेलावन सेंठीलकुमारचा ११-३, ११-४, ११-४ असा धुव्वा उडवला. अव्वल खेळाडू सौरवने देखील आपल्या लौकिकानुसार उपांत्य फेरी निश्चित करताना तामिळनाडूच्याच विजय कुमारचे आव्हान ११-८, ११-२, ११-६ असे संपुष्टात आणले. त्याचप्रमाणे तामिळनाडूच्या हरींदरपालसिंगने सरळ तीन सेटमध्ये बाजी मारताना तामिळनाडूच्याच रवी दिक्षितला ११-६, ११-७, ११-३ असे पराभूत केले.