ठाणे : जगातील सर्वात मोठ्या सहा मॅरेथॉनपैकी शिकागो येथील मॅरेथॉनमध्ये ठाण्यातील सुप्रसिद्ध डॉक्टर महेश बेडेकर यांची निवड झाली आहे. रविवारी सकाळी पार पडलेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये ४२ किमी अंतर केवळ तीन तास २३ मिनिटांत पूर्ण करणाऱ्या डॉ. बेडेकर यांची या मॅरेथॉनच्या टायमिंगवर निवड झाली आहे. शिकागो येथील मॅरेथॉन आॅक्टोबर २०१९ मध्ये होत आहे.डॉ. बेडेकर यांची जगातील सर्वात मोठ्या मॅरेथॉनमध्ये पुन्हा एकदा निवड झाली आहे. आॅक्टोबर, २०१९ मध्ये ते शिकागो येथील मॅरेथॉनमध्ये सहभागी होत आहेत. या आधी ते ३ मार्च, २०१९ रोजी टोकियो येथील मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत. एप्रिल, २०१८ मध्ये त्यांनी लंडन येथील फुल्ल मॅरेथॉन तीन तास ३२ मिनिटांत पूर्ण केली होती. त्या टायमिंगवर त्यांची टोकियो येथे निवड झाली आहे. गेल्या पाच वर्षांपासून डॉ. बेडेकर हे मॅरेथॉनमध्ये सहभागी होत आहेत. जगात सहा मोठ्या मॅरेथॉन होत असतात. त्या ४२ किमी अंतराच्या असतात. त्या न्यूयॉर्क, लंडन, शिकागो, बॉस्टर्न, टोकियो आणि बर्लिन या सहा ठिकाणी भरवल्या जातात. त्यातील २०१६ साली बर्लिन (तीन तास ५६ मिनिटे), २०१७ साली न्यूयॉर्क (तीन तास ३७ मिनिटे), २०१८ साली लंडन (तीन तास ३२ मिनिटे) या तीन मॅरेथॉनमध्ये ते सहभागी झाले होते.
महेश बेडेकर यांची झाली शिकागो येथील मॅरेथॉनमध्ये निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 11:55 PM