किंग्स्टन : पहिल्या कसोटीत शानदार विजयानंतर आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ येथे आज शनिवारपासून सुरू होत असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही यजमान संघाला धोबीपछाड देण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.यंदाच्या मोसमाचा प्रारंभ विजयाने करणाऱ्या टीम इंडियाने विंडीजचा एक डाव ९२ धावांनी पराभव करीत उपखंडाबाहेर सर्वांत मोठा विजय नोंदविला.दुसऱ्या सामन्यात आव्हान सोपे नाही. सबीना पार्कच्या हिरव्यागार खेळपट्टीवर भारतीय खेळाडूंना सावध रहावे लागेल. मागची आकडेवारी बघितल्यास २००८ नंतर येथे कसोटी पाच दिवस रंगलेली नाही. पाचही कसोटी सामने चार दिवसांत संपले होते. यापैकी एक सामना २०११ मध्ये भारताने ६३ धावांनी जिंकला. वेस्ट इंडिजने २०१५ मध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेला सामना चौथ्या दिवशी उपहारापर्यंत संपला होता. हिरव्या खेळपट्टीचा लाभ कुणाला हे भाकीत करणे कठीण आहे. यजमान संघ बरोबरी साधण्याच्या बेतात असल्याने भारताला विजयोत्सवात हुरळून जाता येणार नाही. चार सामन्यांची ही मालिका कुणाकडे कधीही झुकू शकते.भारताचा फलंदाजी क्रम कायम राहणार असे दिसते. पण सलामीचा मुरली विजय याच्या फिटनेसबाबत शंका आहे. तो दुसरा सामना खेळेल की नाही, याबद्दल संभ्रम आहे. त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्यामुळे पहिल्या सामन्यात दोन्ही डावांत क्षेत्ररक्षणासाठी तो आला नव्हता. बुधवारी नेट्सवर त्याने सराव मात्र केला. दुसरीकडे के. एल. राहुलने दोन्ही सराव सामन्यात चांगली फलंदाजी केल्याने तो मुरलीला पर्याय ठरू शकतो. विराट पुन्हा पाच गोलंदाज खेळविणार का, याबद्दल उत्सुकता असेल. विंडीजमध्ये एक किंवा दोन अतिरिक्त गोलंदाज खेळवायचे झाल्यास भारताला आणखी एका तज्ज्ञ फलंदाजाची गरज भासेल. विजय, पुजारा आणि रहाणे यांनी अँटिग्वामध्ये ५६६ पैकी केवळ ४५ धावांचे योगदान दिले. कोहलीने एक तज्ज्ञ फलंदाज खेळविला तर वेगवान गोलंदाजांना अतिरिक्त गोलंदाजीचा भार उचलावा लागेल. अशावेळी स्टुअर्ट बिन्नी हा दोन्हीइणइइणइ प्रकारात कामगिरीसाठी उपयुक्त खेळाडू ठरतो. फिरकीपटूंपैकी अमित मिश्राला विश्रांती देत केवळ अश्विनला खेळविले जाण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे यजमान संघाने युवा अल्जारी जोसेफ याला संघात पाचारण केले. याशिवाय मिगूल कमिन्स हा देखील स्थान मिळविण्यात यशस्वी ठरला आहे. फलंदाजीत मर्लोन सॅम्युअल्स याच्यावर अधिक भिस्त असेल. सॅम्युअल्सची ही अखेरची मालिका मानली जात आहे. (वृत्तसंस्था)सॅम्युअल्स : सबब सांगता येणार नाहीटीम इंडियाविरुद्ध सलामी कसोटीत पत्करावा लागलेला पराभव निराशाजनक असल्याचे सांगत वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज मार्लोन सॅम्युअल्सने पराभवासाठी कुठलीही सबब पुढे करता येणार नसल्याचे म्हटले आहे. भारताने पहिल्या कसोटीत १ डाव ९२ धावांनी विजय मिळवत चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मालिकेतील दुसरी लढत शनिवारपासून खेळली जाणार आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत बोलताना सॅम्युअल्स म्हणाला,‘‘कसोटी सामना म्हणजे आपल्या क्षमतेची चाचणी घेण्यासाठी मोठे व्यासपीठ आहे. या पातळीवर खेळताना निराशाजनक कामगिरीसाठी कुठलीही सबब सांगता येणार नाही. संघात युवा खेळाडूंचा भरणा आहे. त्यांच्याकडे अनुभवाची उणीव आहे, पण संघाच्या निराशाजनक कामगिरीसाठी हे कारण पुढे करता येणार नाही.’’सॅम्युअल्स पुढे म्हणाला,‘‘स्थानिक क्रिकेटमधील कामगिरीच्या आधारावर युवा खेळाडूंनी कसोटी संघात स्थान मिळवले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये लढवय्या वृत्ती असली तरच यश मिळवता येते, याची त्यांना लवकरच कल्पना येईल.’’विंडीजचा क्रिकेटर आॅफ द इयर पुरस्काराचा मानकरी ठरलेल्या सॅम्युअल्सला सध्या कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. त्याने गेल्या १० कसोटी डावात केवळ एकदा अर्धशतकाची वेस ओलांडली. त्याने पहिल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले होते. सॅम्युअल्स म्हणाला, ‘’गेल्या काही दिवसांपासून कामगिरीत सातत्य राखण्यासाठी संघर्ष करीत आहे. गेल्या कसोटी डावात अर्धशतकी खेळी केल्यामुळे आत्मविश्वास उंचावण्यास मदत झाली, पण मला एका मोठ्या खेळीची गरज आहे.’’ फॉर्मची चिंता नाही : चेतेश्वर पुजारामधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा याने स्वत:च्या खराब फॉर्मचा बचाव केला. मला फॉर्मची चिंता नाही. लवकरच मोठी खेळी करणार असल्याचे त्याने संघ व्यवस्थापनाला आश्वासन दिले आहे. सौराष्ट्रच्या या फलंदाजानेकसोटीतील गेल्या सहा डावांत त्याने एकही अर्धशतक झळकविलेले नाही. तो म्हणाला, ‘गेल्या काही सामन्यात माझा खेळ बहरू शकला नव्हता. त्याआधी द. आफ्रिकेतील आव्हानात्मक खेळपट्ट्यांवर धावा केल्या. आता पुन्हा एकदा यशस्वी कामगिरीसाठी सज्ज आहे.’उभय संघ यातून निवडणारभारत : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रिद्धिमान साहा, आर. अश्विन, अमित मिश्रा, रवींंद्र जडेजा, स्टुअर्ट बिन्नी, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, उमेश यादव आणि ईशांत शर्मा. वेस्ट इंडीज : जेसन होल्डर (कर्णधार), क्रेग ब्रेथवेट, राजेंद्र चंद्रिका, डेरेन ब्राव्हो, मर्लोन सॅम्युअल्स, जर्मेन ब्लॅकवुड, रोस्टन चेस, लियोन जॉन्सन, शेन डारिच, देवेंद्र बिशू, कार्लोस ब्रेथवेट, शेनोन गॅब्र्रियल, मिगुल कमिन्स.सामन्याची वेळ : रात्री ८.३० पासून
घोडदौड कायम राखणार
By admin | Published: July 30, 2016 5:28 AM