Major Dhyan Chand Khel Ratna Award 2021 : भारतीय खेळाडूंनी यंदा टोक्यो ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक स्पर्धा गाजवत अविश्वसनीय कामगिरी केली. भालाफेकपटू नीरज चोप्रा ( Neeraj Chopra) यानं टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. १२५ वर्षांच्या इतिहासात भारताचे हे ऑलिम्पिक स्पर्धेतील ट्रॅक अँड फिल्ड प्रकारातील पहिलेच पदक ठरले. २००८नंतर हे भारताचे पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक ठरले. यासह अनेक खेळाडूंनी भारताला ऐतिहासिक क्षण दाखवले. त्यामुळेच यंदा नीरज चोप्रासह १२ खेळाडूंचा आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद ( President Ram Nath Kovind ) यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले.
ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा, रौप्यपदक विजेता कुस्तीपटू रवी कुमार दहिया, बॉक्सिंगपटू लवलिना बोर्गोहेईन, हॉकीपटू पीआर श्रीजेश व मनप्रीत सिंह यांनाही खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले.
खेलरत्न पुरस्कार प्राप्त खेळाडू - नीरज चोप्रा (अॅथलेटिक्स), रवी दहिया (कुस्ती), पी.आर.श्रीजेश (हॉकी), लोव्हलिना बोरगोहाई (बॉक्सिंग), सुनील छेत्री (फुटबॉल), मिताली राज (क्रिकेट), प्रमोद भगत (बॅडमिंटन), सुमीत अंतिल (भालाफेक), अवनी लेखरा (नेमबाजी), कृष्णा नागर (बॅडमिंटन), एम नरवाल (नेमबाजी), मनप्रीत सिंग ( हॉकी)
क्रिकेटपटू शिखर धवन, पॅरा टेबल टेनिसपटू भाविना पटेल, पॅराबॅडमिंटनपटू सुहास यथिराज आणि उंच उडीतील खेळाडू निषाद कुमार आणि ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कांस्य जिंकणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघातील सर्वच खेळाडूंसह ३५ जणांना अर्जुन पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं.