नागपूर : टी-२० विश्वचषकाच्या मुख्य फेरीत धडक देण्यास इच्छुक असलेले झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात विदर्भ क्रिकेट संघटनेच्या माजठा मैदानावर आज शनिवारी ब गटात निर्णायक पात्रता लढत दुपारी ३ वाजेपासून खेळली जाईल. प्रत्येकी दोन सामने जिंकणाऱ्या या संघांमधील जो संघ विजयी होईल तो मुख्य फेरीसाठी पात्र ठरेल तर पराभूत संघाला बाहेर पडावे लागेल. हाँगकाँग आणि स्कॉटलंड आधीच स्पर्धेबाहेर पडल्याने या संघात खेळला जाणारा दुसरा सामना केवळ औपचारिकता असेल. सिबांडाच्या अर्धशतकामुळे विजयी सलामी देणाऱ्या झिम्बाब्वेने दुसऱ्या सामन्यात स्कॉटलंडचा ११ धावांनी पराभव केला. अफगाणिस्तानने सलामीला स्कॉटलंडला १४ धावांनी नमविल्यानंतर हाँगकाँगवर सहा गड्यांनी विजय साजरा केला होता.अफगाणिस्तानचा फलंदाज मोहम्मद शहजाद फॉर्ममध्ये असून त्याने दोन सामन्यात १०२ धावा केल्या तर मोहम्मद नबीने पाच गडी बाद केले. या दोन्ही खेळाडूंकडून संघाला मोठ्या अपेक्षा आहेत. झिम्बाब्वेकडून सिबांडा आणि सीन विलियम्स यांनी अर्धशतके झळकविली आहेत. कर्णधार हॅमिल्टन मस्कद्जा मात्र दोन्ही सामन्यात धावबाद झाला हा चिंतेचा विषय असून त्याला उद्या सावध खेळी करावी लागेल. वेलिंग्टन मस्कद्जा आणि तेंदई चतारा यांनी स्कॉटलंडवरील विजयात मोलाची भूमिका वठविली होती. उभय संघाच्या टी-२० विक्रमावर नजर टाकल्यास अफगाणिस्तानचे पारडे किंचित जड आहे. अफगाण संघाने ४३ पैकी २७ तर झिम्बाब्वेने ५० पैकी केवळ १२ सामने जिंकले आहेत. (क्रीडा प्रतिनिधी)स्थान : व्हीसीए जामठा, वेळ : दुपारी ३ पासून
दोन्ही संघासाठी ‘करा किंवा मरा’
By admin | Published: March 12, 2016 3:17 AM