विशाखापट्टणम : शनिवारी भारताचा पराभव करीत वन-डे मालिका जिंकून कसोटी मालिकेतील पराभवाचा हिशेब चुकता करण्यास उत्सुक असल्याची प्रतिक्रिया न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलरने व्यक्त केली. पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेत भारत-न्यूझीलंड संघांदरम्यान सध्या २-२ अशी बरोबरी आहे. विशाखापट्टणममध्ये खेळल्या जाणारा पाचवा सामना निर्णायक ठरणार आहे. न्यूझीलंडने या लढतीत सरशी साधली तर त्यांना भारतात प्रथमच मालिका विजय साकारता येईल. टेलरने म्हटले की,‘उपखंडात मालिका जिंकणे कठीण असते. आमच्यासाठी ही लढत महत्त्वाची असून चांगली कामगिरी करण्यास उत्सुक आहोत.’न्यूझीलंडने रांचीमध्ये भारताचा १९ धावांनी पराभव करीत मालिकेत बरोबरी साधली होती. टेलर पुढे म्हणाला,‘गेल्या चार महिन्यांपासून विदेश दौऱ्यावर असून मालिका जिंकण्याची संधी असल्यामुळे उत्साह वाढला आहे. आम्हाला यापूर्वी येथे मालिका विजय साकारता आलेला नाही. आम्ही या लढतीत सर्वोत्तम कामगिरी करण्यास प्रयत्नशील आहोत. येथे विजय मिळवण्यासाठी काय करावे लागेल, याची आम्हाला कल्पना आहे. भारतीय संघाला त्यांच्या देशात पराभूत करणे कठीण आहे.
हिशेब चुकता करु : टेलर
By admin | Published: October 29, 2016 1:47 AM