Malaysia Masters 2022: भारताची फुलराणी सायना नेहवाल हिची घोडदौड सलामीच्या सामन्यातच संपुष्टात आली असली तरी भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू आणि स्टार बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉय यांनी मलेशिया मास्टर्स स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या सिंधूने क्रमवारीत ३२ व्या स्थानावर असणाऱ्या चीनच्या झांग यी मानचा २१-१२, २१-१० अशा दोन सरळ गेममध्ये पराभव केला. सायना नेहवालचा पतीन पारुपल्ली कश्यपला मात्र स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले.
पीव्ही सिंधूने दमदार खेळी करत चीनच्या प्रतिस्पर्ध्याला धूळ चारली. झांग यी मान हिचा सिंधूने अवघ्या २८ मिनिटे चाललेल्या खेळात पराभव केला. दुसऱ्या फेरीत आलेल्या तुलनेने तुल्यबळ आव्हानाचा सिंधूने चांगलाच समाचार घेतला. अंतिम ८ खेळाडूंच्या गटात सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना चिनी तैपेईच्या ताई त्सू यिंग हिच्याविरोधात होणार आहे. सिंधूने आतापर्यंत ताई त्सू यिंगशी झालेल्या सामन्यात केवळ ५ सामन्यात विजय मिळवला आहे तर १६ वेळा तिला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
पुरुष एकेरीच्या स्पर्धेत एचएस प्रणॉयने त्झू वेई वांगचा २१-१९, २१-१६ असा सहज पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले. बी साई प्रणीतला मात्र चीनच्या ली शे फेंगकडून ४२ मिनिटांत हार पत्करावी लागली. तो १४-२१, १७-२१ असा पराभूत झाला. तर सायना नेहवालचा पती स्टार बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप यालाही इंडोनेशियाच्या अँथनी सिनिसुका गिंटिंगकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्याचा १०-२१, १५-२१ असा पराभव झाला.