नवी दिल्ली : राजधानीच्या उत्तरेला असलेल्या छत्रसाल स्टेडियमबाहेर ज्युनिअर सुवर्णपदक विजेता मल्ल सागर राणा याच्या हत्येप्रकरणी आरोपी असलेला ऑलिम्पिकचा दुहेरी पदक विजेता अनुभवी पहेलवान सुशील कुमार याची अटकपूर्व जामीन याचिका रोहिणी सत्र न्यायालयाने मंगळवारी फेटाळली.
पोलिसांचा ससेमिरा चुकवून अज्ञातस्थळी दडून बसलेल्या सुशीलचा शोध घेणाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली. याशिवाय सुशीलचा खासगी सचिव अजय हा देखील फरार असून, त्याला शोधून देणाऱ्यास ५० हजारांचा रोख पुरस्कार दिला जाईल. सुशील आणि अजयसह अन्य आरोपींविरुद्ध अजामीनपात्र नोटीस बजाविण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश जगदीश कुमार यांच्या समक्ष झालेल्या सुनावणीच्या वेळी दोन्ही पक्षांनी युक्तिवाद केला.
सुशीलचे वकील सिद्धार्थ लुथरा आणि आर. एस. जाखड यांनी सुशीलच्या वतीने सांगितले की, ‘मी आंतरराष्ट्रीय मल्ल आहे. मला पद्मश्रीसह अन्य प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ऑलिम्पिकमध्ये दोन वेळा देशासाठी पदक जिंकले आहे. छत्रसाल स्टेडियममध्ये ज्युुनिअर मल्लांच्या प्रशिक्षणासाठी माझी विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. मी तेथे कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे.’
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ४ मे रोजी पहाटे १.१५ ते १.३० या वेळेत छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंग परिसरात मल्लांच्या दोन गटात कडाक्याचे भांडण झाले. भांडणाचे रूपांतर मारहाणीत होताच फायरिंग झाले. त्यात पाच मल्ल जखमी झाले असून, त्यात सागर (२३), सोनू (३७), अमित कुमार (२७) आणि दोघांचा समावेश आहे. सागरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचे वडील दिल्ली पोलिसांत हेडकॉन्स्टेबल आहेत. सागर आणि त्याचे मित्र ज्या फ्लॅटवर राहायचे तो फ्लॅट खाली करण्यासाठी सुशील दबाव आणत होता.
पोलिसांनी घटनास्थळावरून पाच वाहनांसह बंदूक आणि तीन जिवंत काडतुसे ताब्यात घेतली. सुशीलवरील गंभीर आरोपांचा तपास सुरू असून, त्याचा शोध घेण्यासाठी दिल्लीसह विविध राज्यांत धाडसत्र सुरूच असल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. आधी लूक आउट नोटीस आणि नंतर अजामीनपात्र वॉरंट बजावूनही सुशीलचा पोलिसांना सुगावा लागलेला नाही. न्यायालयाने विविध बाबी तपासल्यानंतर सुशीलसह सर्व आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला.
मला विनाकारण गोवण्यात आलेमला या प्रकरणात विनाकारण गोवण्यात आले. एफआयआर नोंदविणाऱ्याबाबत कुठलीही माहिती नाही. सोनू नावाची व्यक्ती कुख्यात गुन्हेगार असून, त्याच्या आधीच्या गुन्ह्यांची कुठलीही नोंद एफआयआरमध्ये नाही. माझा पासपोर्ट पोलिसांनी ताब्यात घेतला. मी बंदुकीतून गोळी झाडली नाही, शिवाय माझ्या गोळीमुळे मृताचा जीव गेलेला नाही. माझ्यावर हत्येचा गुन्हा का नोंदविण्यात आला, हे मला माहिती नाही.-सुशील कुमार
पासपोर्ट ताब्यात घेतला नाहीदिल्ली पोलिसांच्या वतीने युक्तिवाद करताना ॲड. अतुल श्रीवास्तव म्हणाले, ‘सुशीलचा पासपोर्ट पोलिसांनी ताब्यात घेतलेला नाही. तो देशाबाहेर पळून जाऊ नये म्हणून स्वत:कडे ठेवला आहे. आम्हीही सुशीलचा सन्मान करतो. मात्र, ज्या सागर नावाच्या मल्लाची हत्या झाली तोदेखील ज्युनिअर गटाचा सुवर्ण विजेता होता. दिल्ली पोलिसांकडे हत्येचे पुरेसे पुरावे आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत.