नवी दिल्ली : सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेची उपविजेती नागपूरची २० वर्षांची युवा खेळाडू मालविका बनसोड आणि इंडिया ओपन बॅडमिंटनचा विजेता लक्ष्य सोन हे मलेशिया येथे १५ ते २० फेब्रुवारी या कालावधीत आयोजित शाह आलम आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघाचे नेतृत्व करतील.भारतीय बॅडमिंटन संघटनेने(बीएआय) मागच्या महिन्यात हैदराबाद आणि चेन्नईत खेळल्या गेलेल्या अ. भा. स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे संघ जाहीर केला. खेळाडूंची निवड दोन स्पर्धांमधील रॅंकिंग गुणांच्या आधारे झाली. अनेक अनुभवी खेळाडू कोरोनाबाधित असल्याने युवा खेळाडूंना स्वत:ची ओळख निर्माण करता यावी यासाठी राखीव फळीला संधी देण्यात येत असल्याची माहिती बीएआय महासचिव अजय सिंघानिया यांनी दिली.
भारतीय संघपुरुष : एकेरी- लक्ष्य सेन, मिथुन मंजुनाथ, किरण जॉर्ज, रघू एम. पुरुष दुहेरी : पीएस रवी कृष्ण - उदयकुमार शंकरप्रसाद, अम्सकरुनन हरिहरन- रुबन कुमार, डिंगकू सिंग -कोंथोजम, मंजित सिंग-खहवॅराकपम.महिला : एकेरी- मालविका बनसोड, आकर्षी कश्यप, अश्मिता चालिहा, तारा शाह. महिला दुहेरी : सिमरन सिंघी - खुशी गुप्ता, व्ही. नीला -अरुबाला, आरती सारा सुनील- रीज महरीन.
उन्नती हुड्डा अंतिम फेरीत, मालविका बनसोड पराभूत कटक : उन्नती हुड्डा हिने शानदार कामगिरीच्या बळावर फॉर्ममध्ये असलेल्या मालविका बनसोडचा उपांत्य फेरीत पराभव करीत ओडिशा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीची अंतिम फेरी गाठली. शनिवारी झालेल्या सामन्यात १४ वर्षांच्या उन्नतीने जेतेपदाची प्रबळ दावेदार मालविकावर ५० मिनिटात २४-२२, २४-२२ ने विजय साजरा केला. मालविकाने अलीकडे इंडिया ओपनमध्ये सायना नेहवालला नमविले. त्यानंतर सय्यद मोदी बॅडमिंटनच्या अंतिम सामन्यात पी.व्ही. सिंधूकडून ती पराभूत झाली होती. येथे मालविकाने ज्युनियर गटात विश्व क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या तसनीम मीरचा पराभव केला होता. दुसऱ्या उपांत्य सामन्यात जागतिक क्रमवारीत १६३ व्या स्थानावर असलेल्या तोष्णिवालने अश्मिता चालिहाचा २१-१९, १०-२१, २१-१७ ने पराभव केला.