भुकेने व्याकुळ असलेली गर्भवती हत्तीण काहीतरी खायला मिळेल या आशेनं एका वसाहतीत गेली. पण, स्थानिकांनी तिला अननसातून फटाके खायला दिली. अननसाचं आवरण असलेल्या पदार्थात स्थानिकांनी पेटते रॉकेट, बॉम्ब ठेवले होते. भुकेल्या हत्तीणीला हे समजण्यात विलंब झाला आणि तिनं तो पदार्थ अननस म्हणून खाल्ला. त्यानंतर तिच्या तोंडात फटाक्यांचा स्फोट झाला. असह्य वेदनेसह ती तेथून पळाली आणि एका नदीत जाऊन उभी राहिली. पण अखेर आठवडाभराच्या संघर्षानंतर तिने प्राण सोडले. केरळ येथील मलाप्पूरम येथे घडलेल्या या घटनेचा देशभरातून निषेध होत आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले गेले असले तरी हे कृत्य मानव जातीची मान शरमेनं झुकवणारं असल्याचे मत कुस्तीपटू गीता फोगाटनं व्यक्त केलं.
भारताची कुस्तीपटू गीता म्हणाली,'' मानव जातीच्या पापाचा घडा भरतोय. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे.''
''केरळमध्ये जे घडलं ते ऐकून मन अस्वस्थ झालं. प्राण्यांशी प्रेमाने वागा आणि असे भ्याड कृत्य थांबवा, '' असे आवाहन विराट कोहलीनं केलं आहे. ''माणसांचे अजून एक लाजीरवाणे कृत्य... या दोषींवर कारवाई झालीच पाहिजे. हत्तीणीनं आपल्यावर विश्वास ठेवला आणि आपण तिची निर्दयीपणे हत्या केली,'' अशा शब्दात सुरेश रैनानं राग व्यक्त केला.
फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री म्हणाला,''ती गर्भवती होती, तिच्याकडून काहीच धोका नव्हता. लोकांनी जे केलं ते अमानवी कृत्य होतं आणि त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल. आपण पुन्हा पुन्हा निसर्गाला हानी पोहोचवत आहोत. आपण स्वतःला विकसित प्रजाती कसं म्हणू शकतो?''
अरे बापरे! दिग्गज फुटबॉलपटू डिएगो मॅराडोनाची अशी अवस्था? जाणून घ्या Video मागचं सत्य