मुंबई : अव्वल मानांकित मानसी चिपळूणकरने लौकिकास साजेसा खेळ करत टेबल टेनिस स्पर्धेच्या युवा आणि ज्युनियर मुलींच्या गटात बाजी मारली. या विजयामुळे मानसीने मुंबई शहर जिल्हा टेबल टेनिस स्पर्धेत विजयाचा डबल धमाका केला. तर पुरुष गटात परेश मुरेकर आणि महिला गटात श्वेता पारटेने विजेतेपदावर नाव कोरले.मरिन लाइन्स येथील विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात स्पर्धेचे सामने पार पडले. निर्णायक सामन्यात दुसऱ्या मानांकित कृष्णा अग्रवालने पहिल्या सेटमध्ये ११-९ असा विजय मिळवत सामन्यात १-० अशी आघाडी घेतली. मात्र मानसीने उर्वरित सामन्यात शानदार पुनरागमन करत सामन्याचे चित्रच पालटले. मानसीने सलग चार सेट ११-६, ११-३, ११-६, ११-३ असे जिंकत ज्युनियर गटाच्या विजेतेपदावर निर्विवाद नाव कोरले. तर युवा गटातदेखील मानसीचा सामना कृष्णाशीच झाला. या वेळी मानसीने कृष्णाला सेट जिंकण्याची एकही संधी दिली नाही. चार सेटमध्ये खेळविण्यात आलेल्या सामन्यात मानसीने आपला दबदबा कायम राखत कृष्णाचा ४-० असा धुव्वा उडवला.महिला गटात झालेल्या स्पर्धेत श्वेता पारटेने रुचिरा मानेकरवर ११-७,१२-१०,११-६,११-५ अशी मात करीत निर्णायक विजय मिळवला. सामन्यात १-१ अशा बरोबरीनंतर अंतिम दोन सेटमध्ये श्वेताने विजय निश्चित केला. पुरुष गटात परेश मुरेकरने तन्मय राणेचा ४-० असा पराभव करीत स्पर्धेत सहज विजयाची नोंद केली. तन्मयने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला; मात्र अनुभवाच्या जोरावर परेशने बाजी मारत अजिंक्यपदाला गवसणी घातली. (क्रीडा प्रतिनिधी)मिडगेट (मुले) : सिद्धार्थ शाह वि.वि. मीर भुवा ११-९, ११-६, ११-३. मिडगेट (मुली) : केईशा झेरीम वि.वि. शान्या पारेख ११-१, ११-६, ११-१.युवा (मुले) : मुदित दानी वि.वि. पार्थव केळकर ११-५, ११-९. ८-११, ११-७, ११-५.
मानसी चिपळूणकरचा डबल धमाका
By admin | Published: September 25, 2016 12:41 AM