मॅँचेस्टर : इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये शनिवारी (दि. २०) मँचेस्टर सिटीने क्रिस्टल पॅलेसवर ३-० अशी मात केली. या विजयामुळे चेल्सी (३९ गुण) व मँचेस्टर सिटी संयुक्तपणे अग्रस्थानी पोहोचले. मॅँचेस्टरच्या या विजयात डेव्हिड सिल्वाने मोलाची कामगिरी केली.गतविजेत्या मँचेस्टर सिटीला त्यांच्या नेहमीच्या स्ट्रायकरशिवाय मैदानात उतरावे लागले. सर्जियो अॅग्वेरो, झेको, योवेटिक यांच्या दुखापतीमुळे व जोस एंजेल पोझो आजारी पडल्यामुळे मँचेस्टर सिटीची नेहमीची आघाडीची फळी मैदानात नव्हती. त्यामुळे अष्टपैलू खेळाडू जेम्स मिलनेर याला सेंटर फॉरवर्डला खेळावे लागले. सामन्यात सिटीच्या खेळाडूंनी खूप चांगल्या चाली रचल्या. मात्र, पॅलेसच्या खेळाडूचा बचाव भक्कम होता. सामन्याच्या २४ व्या मिनिटात आलेल्या संधीचे सिल्वाने गोलमध्ये रूपांतर केले. पॅलेसच्या खेळाडूंनी वेग आणि अपरंपरागत चालींवर भर दिला. मात्र, त्यांचे सिटीच्या आक्रमणापुढे काही चालले नाही.उत्तरार्धात सिटीने अधिक आक्रमक खेळ करण्यास प्रारंभ केला. फर्नांडिन्होने दिलेल्या शॉर्टपासवर गोल करत सिल्वाने स्वत:चा दुसरा गोल करत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. यामुळे पॅलेसचे खेळाडू दबावाखाली आले. सामन्याच्या ६१ व्या मिनिटात कोलारोव्हने गोल करत सिटीची आघाडी ३-० ने वाढवली. अग्रस्थानी राहण्यासाठी सिटीला पॅलेसवर ४-० असा विजय आवश्यक होता. मात्र ३-० विजयामुळे मॅँचेस्टर सिटी आणि चेल्सी यांचे गुण समान झाले आहेत.
डेव्हिड सिल्वाच्या खेळाने मँचेस्टर सिटीचा विजय
By admin | Published: December 22, 2014 4:50 AM