केदार लेले, लंडनइंग्लिश प्रीमियर लीगमध्ये शनिवारी उशिरा झालेल्या सामन्यात मँचेस्टर युनायटेडने आर्सनलचा २-१ गोल फरकाने पराभव केला. या विजयासह मँचेस्टर युनायटेडने गुणतक्त्यात चौथ्या स्थानावर झेप घेतली. आर्सनल आणि मँचेस्टर युनायटेड यांच्यात होणारी ही २१९ वी लढत होती. मँचेस्टर युनायटेडचा संघ ९३ वेळा विजयी झाला आहे, तर आर्सनल ७९ वेळा विजयी झाला आहे. ४८ लढती अनिर्णीत राहिल्या आहेत.पूर्वार्धात वर्चस्व गाजवणाऱ्या आर्सनलला मँचेस्टर युनायटेडचा अभेद्य बचाव भेदता न आल्यामुळे, आर्सनल आणि मँचेस्टर युनायटेड संघात गोलशून्य बरोबरी राहिली. उत्तरार्धात (५५ व्या मिनिटाला) विल्शायारच्या घोट्याला जखम झाली आणि त्याला मैदान सोडावे लागले. त्यानंतर एक मिनिटातच आर्सनल विरुद्ध मँचेस्टर युनायटेडने १-० अशी आघाडी घेतली. ती आर्सनलच्या किएरन गिब्सकडून ५६ व्या मिनिटाला झालेल्या स्वयंगोलमुळे.५६व्या मिनिटाला किएरन गिब्सकडून स्वयंगोल झाल्यामुळे आर्सनलचे समर्थक नाराज झाले, पण हा गोल होताना गब्स व गोलकिपर सेझेस्नी यांच्यात टक्कर झाली. ज्यात सेझेस्नी जखमी झाला आणि त्यालासुद्धा मैदान सोडावे लागले.जायबंदी खेळाडू आणि ०-१ ने पिछाडीवर पडलेल्या आर्सनल संघाने पुनरागमन करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. सामना संपायला केवळ ५ मिनिटे बाकी असताना स्ट्रायकर कप्तान वेन रूनीने (८५व्या मिनिटाला) पाहुण्या मँचेस्टर युनायटेड संघाला २-० अशी निर्विवाद आघाडी मिळवून दिली. काउंटर अॅटॅकवर फेलेनी आणि डी. मारिया या द्वयीने दिलेल्या उत्कृष्ट पासवर वेन रूनीने हा गोल केला.०-२ ने पिछाडीवर पडलेल्या आर्सनल संघाने जिवाचे रान करीत सामन्यात पुनरागमन करण्यास शर्थीचे प्रयत्न केले. तीन महिन्यांनी पुनरागमन करणाऱ्या जिरूने ‘इंज्युरी-टाइम’ सुरू होण्यापूर्वी काहीच क्षण बाकी असताना केलेल्या गोलमुळे आर्सनलने युनायटेडची आघाडी एका गोलने कमी केली. मिनिटांच्या वाढीव ‘इंज्युरी-टाइम’मध्ये मँचेस्टर युनायटेडने आर्सनलचे हल्ले परतवले आणि मँचेस्टर युनायटेडची २-१ गोल फरकाने सरशी झाली.
मँचेस्टर युनायटेड विजयी
By admin | Published: November 24, 2014 2:40 AM