कोल्हापूर : बाराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा फेबु्रवारीत आसाम येथे होत आहेत. या स्पर्धांसाठी केंद्र शासनाने ‘मॅस्कॉट’ अर्थात ‘शुभंकर’ संकल्पनेची स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये कोल्हापूरच्या ‘निर्मिती ग्राफिक्स’ने पाठविलेल्या ‘तिखोर (मस्तीखोर) गेंडा’ या संकल्पनेला प्रथम पारितोषिक मिळाले. स्पर्धेच्या निमित्ताने हा ‘तिखोर’ स्पर्धेतील सहभागी देशांत झळकणार आहे, अशी माहिती ‘निर्मिती’चे अनंत खासबारदार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. हा शुभंकर तयार करण्यात त्यांना संकल्पक शिरीष खांडेकर यांना सुशांत सासने या सहकाऱ्यांनी कलापूर्ण साथ दिली. खासबारदार म्हणाले, ही स्पर्धा आसाममध्ये प्रथमच होत आहे. त्यानिमित्त सप्टेंबर २०१५ मध्ये ‘शुभंकर’ या संकल्पनेची स्पर्धा केंद्र सरकारने आयोजित केली होती. यामध्ये देशातील ४५०हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. आसाममध्ये एकशिंगी गेंडा हे शुभ प्रतीक मानले जाते. त्यामुळे ‘भारतीय खेळ प्राधिकरणाने’नेही ते स्वीकारले आहे. ‘तिखोर’ हा मस्तीखोर, अल्लड व चपळ असतो. शुभंकरसाठी प्रथम आम्ही पळणारा, फुटबॉल खेळणारा, गेंडा, आदी प्रकारची संकल्पना प्राधिकरणापुढे मांडली होती. त्यातून मस्तीखोर तिखोर गेंडा या कल्पनेला प्रथम पारितोषिक मिळाले. या मस्तीखोर तिखोर शुभंकरचे उद्घाटन १३ डिसेंबरला केंद्रीय क्रीडामंत्री सोनोवाल व आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगई यांच्या हस्ते झाले. विख्यात संगीतकार भूपेंद्र हजारिका यांचे थीम साँग या तिखोरसोबत वाजणार आहे. या स्पर्धेत भारतासह नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान, भूतान, श्रीलंका या देशांसाठी २६ क्रीडाप्रकार असणारी ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. या सहभागी देशांतही हा तिखोर अर्थात मस्तीखोर गेंडा झळकणार आहे. २००७ साली आसाममध्ये झालेल्या ३३ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ‘रंगमान’ हा शुभंकर आसामी गेंडा होता. त्यात सुधारणा होऊन रंगमानचा ‘तिखोर’ हा नव्या स्वरूपात व नव्या दिमाखात सादर झाला आहे.राष्ट्रीय पातळीवर ‘अनंत’ यश..‘निर्मिती’ने सादर केलेल्या संकल्पनेला प्रथम पारितोषिक मिळाले आहे. यामध्ये मागील वर्षी आॅक्टोबरमध्ये केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या संकल्पनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले होते. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावरील ‘नॅशनल डिजिटल लिटरसी मिशन’ या संकल्पनेलाही पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर ‘इंडो-आफ्रिका हायड्रो समिट’मध्येही संधी मिळाली होती आणि आता तिखोरच्या संकल्पनेलाही यश मिळाले आहे.निर्मिती परिवाराचे सामूहिक प्रयत्न, आसामी वेशभूषेचा, स्वागत परंपरेचा अभ्यास, क्रीडा स्पर्धेचा नेमका उद्देश समजून घेऊन ‘शुभंकर’ निर्माण झाला. यात माझ्यासह संकल्पक शिरीष खांडेकर यांना सुशांत सासने या सहकाऱ्याने कलापूर्ण साथ दिली.- अनंत खासबारदारकोणत्याही खेळांच्या स्पर्धा होताना त्यातून एखादी संकल्पना मांडली जाते. जेव्हा आशियाई स्पर्धा भारतात झाल्या, तेव्हा त्याचा ‘अप्पू’ हा शुभंकर होता. एअर इंडियाचा ‘महाराजा’ हा शुभंकर मानला जातो. तसाच दक्षिण आशियाई स्पर्धेचा मस्तीखोर गेंडा हा शुभंकर आहे. तो त्या स्पर्धेचा लोगो नव्हे.- शिरीष खांडेकर
सॅफ गेम्सचा ‘मस्तीखोर गेंडा’ कोल्हापूरचा
By admin | Published: December 20, 2015 2:50 AM