Manika Batra ITTF-ATTU Asian Cup: स्टार भारतीयटेबल टेनिसपटूमनिका बत्रा हिने शनिवारी ITTF-ATTU आशियाई चषक स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आणि या स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरण्याचा मान मिळवला. तिने जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या आणि तीन वेळा आशियाई चॅम्पियन असलेल्या हिना हयाता विरुद्धचा कांस्यपदक सामना ४-२ ने जिंकला. मनिका बात्राने प्रतिस्पर्ध्याला ११-६, ६-११, ११-७, १२-१०, ४-११, ११-२ असे पराभूत केले.
तत्पूर्वी, उपांत्य फेरीच्या लढतीत तिला मीमा इटोकडून २-४ (८-११, ११-७, ७-११, ६-११, ११-८, ७-११) असा पराभव पत्करावा लागला होता. तिला हरवल्यानंतरही तिने कांस्यपदकाच्या सामन्यात खेळून बक्षीस पटकावले. थायलंडमधील बँकॉक येथे सुरू असलेल्या आशियाई चषक 2022 स्पर्धेच्या पहिल्या फेरीत गुरुवारी मनिका बत्राने जागतिक क्रमवारीत ७व्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या चेन झिंगटोंगवर विजय मिळवण्यासाठी जबरदस्त कामगिरी केली होती.
हुआमार्क इनडोअर स्टेडियमवर झालेल्या स्पर्धेत, जागतिक क्रमवारीत ४४व्या क्रमांकावर असलेल्या बात्राने चौथ्या मानांकित टेबल टेनिसपटूचा ४-३ (८-११, ११-९, ११-६, ११-६, ९-११, ८-११, ११-) असा पराभव केला. यानंतर ती उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरली. क्यूएफमध्ये तिने तैवानच्या चेन स्झु-यूचा ४-३ (६-११, ११-६, ११-५, ११-७, ८-११, ९-११, ११-९) असा पराभव करून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरली.