उलान उदे (रशिया) : भारताच्या मंजू राणीने (४८ किलो) सोमवारी येथे अंतिम १६ च्या लढतीत सहज विजय मिळवताना जागतिक महिला बॉक्सिंग अजिंक्यपदच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. सहाव्या मानांकित मंजूने व्हेनेझुएलाच्या रोजास टेयोनिस सेडेनोचा ५-० ने पराभव केला. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये पदार्पण करीत असलेली मंजू या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पदक जिंकण्यापासून केवळ एक विजय दूर आहे. त्याचवेळी मंजू बमबेरियाला ६४ किलो वजनी गटात पराभवाचा सामना करावा लागला.उपांत्यपूर्व फेरीत मंजूचा मार्ग सोपा नाही. येथे तिला गत कांस्यपदक विजेती व अव्वल मानांकित दक्षिण कोरियाच्या किम हयांग मीसोबत १० आॅक्टोबरला लढत द्यावी लागणार आहे. राणीला सेडेनोविरुद्ध जोरकस ठोसे लगावता आले नाही. पण भारतीय खेळाडूने प्रतिस्पर्धी खेळाडूच्या तुलनेत चांगली कामगिरी केली. दोन्ही बॉक्सर्सनी बचावात्मक पवित्रा स्वीकारला होता, पण मंजूचे ठोसे अधिक अचूक होते.दुसरीकडे मंजू बमबोरिया (६४ किलो) हिला मात्र चौथ्या मानांकित इटलीच्या एंजेलो करिनीविरुद्ध पराभव पत्करावा लागला. बमबोरियाने कडवी लढत दिली, पण तिला युरोपियन रौप्यपदक विजेत्या खेळाडूविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. भारतीय खेळाडूचा खंडित निर्णयामध्ये १-४ ने पराभव झाला.सुपरमॉम मेरीकोमकडे लक्षमंगळवारी दिग्गज एम. सी. मेरीकोम (५१ किलो) उप-उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या जुतामस जितपोंगविरुद्ध लढेल. तिसऱ्या मानांकित मेरीला पहिल्या फेरीत बाय मिळाला आहे. माजी रौप्यपदक विजेती स्वीटी बुरा ७५ किलो वजनगटात दुसºया मानांकित वेल्सच्या लॉरेन प्रिन्सविरुद्ध खेळेल.
मंजू राणी उपांत्यपूर्व फेरीत; अन्य लढतीमध्ये बमबोरिया पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2019 1:20 AM