उलान उदे : भारतीय बॉक्सर मंजू राणीला महिला विश्व चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागल्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. हरयाणाच्या या बॉक्सरला लाईट फ्लायवेट (४८ किलो) गटाच्या अंतिम लढतीत रशियाच्या एकातेरिना पाल्सेवाविरुद्ध ४-१ ने पराभव स्वीकारावा लागला.
येत्या शनिवारी राणी २० व्या पदार्पण करेल. यंदाच्या जागतिक स्पर्धेत अंतिम फेरी गाठणारी ती एकमेव भारतीय होती. यापूर्वी सहावेळची चॅम्पियन एम. सी. मेरीकोम (५१ किलो), जमुना बोरो (५४ किलो) व लवलीना बोरगोहेन (६९ किलो) यांना कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. बोरगोहेनचे हे सलग दुसरे कांस्यपदक होते.
राणी व तिच्या प्रतिस्पर्धी खेळाडूने पहिल्या फेरीत आक्रमक खेळ केला. पहिल्या तीन मिनिटांमध्ये रशियन बॉक्सरने दमदार ठोसे लगावले. दुसऱ्या फेरीत राणीने जोरदार प्रत्युत्तर देत स्थानिक खेळाडूवर वर्चस्व गाजवले. अखेरच्या तीन मिनिटांमध्ये उभय खेळाडूंनी सावध खेळ केला. रशियन बॉक्सरला सरस रिफ्लॅक्सेसच्या आधारावर विजेता जाहीर करण्यात आले. राणीने यंदा पंजाबतर्फे राष्ट्रीय जेतेपद पटकावत राष्ट्रीय शिबिरात स्थान मिळवले होते. तिने यंदा प्रथमच स्ट्रांजा स्मृती स्पर्धेत सहभागी होत रौप्यपदक जिंकले होते. रोहतकच्या रिठाल फोगाट गावात राहणाºया राणीचे वडील सीमा सुरक्षा दलात अधिकारी होते. त्यांचे २०१० मध्ये कर्करोगामुळे निधन झाले होते.