नवी दिल्ली : भारतीय बॉक्सिंगमध्ये सुरू असलेल्या प्रशासकीय गलथानामुळे मुष्टियोद्धा मनोज कुमार खिन्न झाला असून, याच कारणामुळे रिओ आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकता न आल्याची खंत त्याने व्यक्त केली. भारतीय बॉक्सिंग सध्या वाईट परिस्थितीत असून, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यस्थी करण्याची गरज असल्याचे त्याने सांगितले.तो म्हणाला, ‘भारत जर आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेकडून (एआयबीए) निलंबित नसता, तर मी पदक जिंकले असते. प्री क्वॉर्टरफायनलमधील पहिल्या लढतीत निकाल माझ्या बाजूने लागला असता, तर चित्र वेगळे असते.’ हा लाईट वेल्टरवेट मुष्टियोद्धा रिओ आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या उज्बेकिस्तानच्या फजलीद्दीन गॅबनाजारोव्हकडून पराभूत झाला. चार वर्षांपासून सुरू असलेल्या प्रशासकीय गलथानपणामुळे भारताची रिओ आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची शक्यताच पूर्णपणे मावळली होती. भारताच्या मुष्टियोद्ध्यांनी याआधीच्या दोन आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकले होते; परंतु असे ८ वर्षांत कधी घडले नव्हते.हरियाणाचा २९ वर्षीय मुष्टियोद्धा रिओसाठी पात्र ठरल्यानंतर त्याला जूनमध्ये टार्गेट आॅलिम्पिक पोडियममध्ये समाविष्ट करून घेण्यात आले होते. तो म्हणाला, ‘इतरांना जे सहकार्य मिळाले, ते मला मिळाले नाही. मलादेखील पात्र ठरण्यासाठी इतरांसारखी तितकीच मेहनत घ्यावी लागली. कोणीदेखील मला पाठिंबा दिला नाही. मला कधीही पदकांचा दावेदार मानले गेले नाही, तसेच त्यासाठी आर्थिक मदतही दिली नाही.’
खेळात हस्तक्षेप करण्याचे मनोजचे पंतप्रधानांना साकडे
By admin | Published: August 29, 2016 1:47 AM