इपोह : भारतीय हॉकी संघाचा अव्वल मध्यरक्षक मनप्रीतसिंग आज, रविवारी कॅनडाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळणार असल्याने संघाची मध्यफळी मजबूत झाली आहे. वडिलांचे निधन झाल्याने मनप्रीत तातडीने मायदेशी परतला होता. अंत्येष्टीचा कार्यक्रम आटोपून तो पुन्हा देशसेवेसाठी रुजू झाला आहे.मनप्रीतने शनिवारी सकाळी संघासोबत सराव सत्रातही हजेरी लावली. त्याच्या सहभागामुळे संघ संतुलित झाला आहे. जपानविरुद्धच्या सामन्यापूर्वी वडिलांच्या निधनाचे वृत्त त्याला समजले होते. त्यामुळे तो तातडीने मायदेशी परतला. त्याच्या अनुपस्थितीत संघातील खेळाडूंनी दंडावर काळी पट्टी लावून सामना खेळला. या सामन्यात संघाला त्याची उणीव चांगलीच जाणवली.यापूर्वी झालेल्या सामन्यात कॅनडाने भारताला चांगलेच झुंजविलेले आहे. गेल्या वर्षी याच स्पर्धेत भारताची गाठ कॅनडाशी पडली होती. त्यात भारताने ५-३ असा विजय मिळविला होता. मात्र, कॅनडा डोकेदुखी ठरू शकतो, याची जाणीव असल्याने भारताचे प्रशिक्षक रोलेंट ओल्टमेंस यांनी कॅनडाच्या खेळाडूंचा सराव पाहिला.या स्पर्धेत कॅनडाने जपानला ३-१ने नमविले. न्यूझीलंडबरोबरचा सामना १-१ असा बरोबबरीत, तर पाकिस्तानकडून १-३ असा पराभव कॅनडाला स्वीकारावा लागला. तीन सामन्यांत त्याचे ४ गुण झाले आहेत. कॅनडाविरुद्ध अनेकदा खेळलेला सरदार म्हणाला, ‘‘या सामन्यात भारतीय संघ गत वर्षीची विजयी मालिका कायम ठेवण्यासाठी उतरेल. मात्र, कॅनडाला कमी लेखून चालणार नाही. प्रशिक्षकदेखील एक उद्दिष्ट घेऊन येथे आले असल्याने प्रत्येक सामन्यात त्याचे परिणाम दिसून येतील.’’कॅनडाचे प्रशिक्षक अँथनी फैरी म्हणाले, ‘‘भारताविरुद्धचा सामना सोपा असणार नाही. त्यांच्या संघाकडून जोरदार आव्हान मिळेल. भारताकडे काही वेगवान खेळाडू आहे; मात्र त्यांच्या खेळाची आम्हाला कल्पना आहे. आम्हालादेखील या सामन्यात आपला सर्वश्रेष्ठ खेळ दाखवावा लागेल.’’
मनप्रीतमुळे मध्यफळी मजबूत
By admin | Published: April 10, 2016 3:28 AM