भोपाळ : राष्ट्रकुल स्पर्धेतील चॅम्पियन मनू भाकर आणि अनीश भानवाला यांनी मंगळवारी येथे राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत अनुक्रमे महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल आणि पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात वरिष्ठ व कनिष्ठ गटात सुवर्णपदक जिंकले. हरयाणाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या १७ वर्षीय मनू हिने मंगळवारी चार सुवर्णपदके जिंकली. यात वरिष्ठ, कनिष्ठ गटात वैयक्तिक व सांघिक सुवर्णपदकांचा समावेश आहे. तिने यादरम्यान राष्ट्रीय क्वॉलिफिकेशन रेकॉर्डची बरोबरी साधली.
हरयाणाच्याच १७ वर्षीय अनीशनेदेखील वरिष्ठ आणि कनिष्ठ गटात वैयक्तिक व सांघिक सुवर्णपदक जिंकताना वर्चस्व राखले. भारतासाठी टोकियो आॅलिम्पिकच्या १५ कोट्यांपैकी एक प्राप्त करणाºया मनूने पात्रता फेरीमध्ये ५८८ गुणांसह दक्षिण आशियाई स्पर्धेतील अनुराज सिंगच्या राष्ट्रीय विक्रमाची बरोबरी साधली. तिने आठ नेमबाजांच्या अंतिम फेरीमध्ये २४३ गुणांसह विजेतेपद पटकावले. देवांशी धामाने २३७.८ गुणांसह रौप्य आणि टोकियो आॅलिम्पिकचा कोटा मिळवणाºया यशस्विनी सिंग देसवालने २१७.७ गुणांसह कांस्यपदक जिंकले.अनीशने २८ गुणांसह रॅपिड फायर अंतिम फेरीत राजस्थानच्या भावेश शेखावतला पिछाडीवर टाकत विजेतेपद पटकावले. भावेशने २६, तर चंदीगडच्या विजयवीर सिद्धूने २२ गुण मिळवले. अनीश पात्रता फेरीतही ५८२ गुणांसह अव्वल राहिला. (वृत्तसंस्था)