manu bhaker and sarabjot singh : भारताची महिला नेमबाज मनू भाकरने ऐतिहासिक कामगिरी करताना दोन कांस्य पदक जिंकण्याची किमया साधली. रविवारी मनू भाकरने वैयक्तिक कांस्य पदक जिंकले होते. मंगळवारी यात भर पडली असून, तिने सरबजोत सिंगसोबत आणखी एका पदकाला गवसणी घातली. मनू भाकर आणि सरबजोत सिंग या जोडीने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला. मनू आणि सरबजोतने शूटींगच्या १० मीटर एअर पिस्तुल मिश्र प्रकारात कांस्य पदकावर निशाणा साधला. याआधी रविवारी मनू भाकरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्य पदक जिंकून भारताचे खाते उघडले होते. एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी मनू भाकर ही भारताची पहिलीच खेळाडू ठरली आहे. (manu bhaker latest news)
विशेष बाब म्हणजे आणखी एका स्पर्धेत मनू खेळणार आहे. त्यामुळे त्यादेखील स्पर्धेत मनूच्या हाती पदक लागेल अशी आशा भारतीयांना आहे. याचाच दाखला देत मनूने तमाम भारतीयांना खास आवाहन केले आहे. मी दोन पदके जिंकू शकले याचा खूप आनंद आहे. पण, मी आणखी पदक जिंकू शकले नाही तर प्लीज माझ्यावर रागवू नका, असे मनू भाकरने विजयानंतर म्हटले.
कोण आहे मनू भाकर?पिस्तूल खराब झाल्यामुळे टोकियो ऑलिम्पिकमध्ये मनूला पुढील फेरी गाठता आली नव्हती. स्पर्धेबाहेर होताच ती भावुक झाली होती. २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकपासून भारताने नेमबाजीत एकही पदक जिंकले नव्हते. नेमबाज मनू भाकरने आपल्या विलक्षण कौशल्याने आंतरराष्ट्रीय क्षेत्रात नाव कमावले. ती मूळची हरयाणातील झज्जर येथील आहे. १८ फेब्रुवारी २००२ रोजी जन्मलेल्या मनूने नेमबाजीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. सर्वात आशादायी तरुण खेळाडूंपैकी एक म्हणून तिने ओळख मिळवली. मनूने लहानपणापासूनच खेळात रस दाखवला आणि नेमबाजीमध्ये तिची आवड निर्माण होण्यापूर्वी बॉक्सिंग, टेनिस आणि स्केटिंगसारख्या इतर खेळांमध्ये नशीब आजमावले. आपल्या एका मुलाखतीत मनूने तिच्या यशाचे श्रेय आई-वडिलांना दिले. आपल्या जुन्या दिवसांची आठवण करून देत मनूने सांगितले की, तिच्या आई-वडिलांनी सुरुवातीपासूनच तिला खूप पाठिंबा दिला आहे. खेळ मी खेळायचे पण यासाठी आई-वडील कष्ट घेत असत.