manu bhaker paris olympic 2024 : ऑलिम्पिक २०२४ मध्ये दोन कांस्य पदक जिंकणारी मनू भाकर आज अनेकांसाठी प्रेरणा आहे. टोकियो ऑलिम्पिकमधील निराशाजनक कामगिरीनंतर तिने जोरदार पुनरागमन करत ऐतिहासिक कामगिरी केली. विविध स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. चेन्नईतील एका शालेय कार्यक्रमात बोलताना २२ वर्षीय मनूने उपस्थित विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व सांगितले. तिचा प्रवास सांगताना मनूने विद्यार्थी क्रीडा क्षेत्राकडे कसे वळतील यावर भर दिला. तसेच क्रीडा क्षेत्रात करिअरची संधी असल्याचे तिने नमूद केले.
मनूने सांगितले की, टोकियो ऑलिम्पिकपासून पॅरिस ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास फार खडतर होता. निराशाजनक कामगिरीनंतर पुन्हा नव्या जोमाने सराव करणे हे आव्हानात्मक होते. मी जगात दुसऱ्या क्रमांकावर होती, पण तिथेही समाधानी नव्हती. कारण मला माहिती आहे खेळात विजय आणि पराभवाची चाचणी होत असते. हेच तर खेळाचे सौंदर्य आहे. कधी तुम्ही जिंकता तर कधी हरता... पण यासाठी तुम्हाला कठोर मेहनत ही घ्यावीच लागेल.
क्रीडा क्षेत्रात करिअरची संधी - मनू मनू पुढे म्हणाली की, तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत आणि सातत्याने चांगले कार्य करत राहावे लागेल. सुरुवात छोटी असली तरी स्वप्न नेहमी मोठे पाहायला हवे. मी हाच मंत्र घेऊन पुढे चालत असते... हार जीत याचा फारसा विचार करत नाही. आपल्याकडे करिअर घडवण्यासाठी खूप सारे पर्याय आहेत. त्यासाठी तुम्ही डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हावे असे काही नाही. क्रीडा क्षेत्रातील जीवन खूप सुंदर आहे. इथे आर्थिक मदतीपासून ते सर्वकाही मिळते. यासाठी तुम्हाला स्वत:हून यात रस दाखवायला हवा. तुम्हाला खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. मला देखील इंग्रजी बोलणाऱ्या लोकांशी कसा संवाद साधायचा याची कल्पना नव्हती. इतर अनेक गोष्टी मला कधीच माहित नव्हत्या. पण, मी स्वत:ला शिकायला मदत केली आहे.