Manu Bhaker News : भारताची स्टार महिला नेमबाज मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. १० मी. महिलांच्या पिस्तूल प्रकारात तिने कांस्य पदक पटकावले. याशिवाय मनू भाकरने सरबजोत सिंगच्या साथीने कांस्य पदक जिंकून एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू बनण्याचा मान पटकावला. मनू भारतात परतताच तिचे मोठ्या जल्लोषात स्वागत झाले. अनेकदा ती तिच्या दोन कांस्य पदकांसोबत दिसल्याने नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले. मात्र, आता या प्रतिक्रियांवर मनूने भाष्य करत सावध उत्तर देताना नेटकऱ्यांना फटकारले आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार टीकाकारांना उत्तर देताना मनू भाकरने म्हटले की, पदके दाखवण्याचा उद्देश्य हा वेगळा आहे. यामुळे माझा प्रवास इतरांना कळावा आणि त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी मी पदकांसह अनेकदा वावरले. देशाचे प्रतिनिधित्व करणे म्हणजे अभिमानाची बाब हे यातून दिसते. जेव्हा कधी मला एखाद्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले जाते तेव्हा मी अभिमानाने ही पदके दाखवत असते. माझा अद्भुत प्रवास सांगण्याची ही माझी शैली आहे.
मनू भाकरची ऑलिम्पिक २०२४ मधील कामगिरी
२८ जुलै, रविवार : या दिवशी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताला मनू भाकरने पहिले पदक मिळवून दिले. १० मी. महिलांच्या पिस्तूल प्रकारात तिने कांस्य पदक पटकावले. रविवारी दुपारी झालेल्या अंतिम फेरीत भारताच्या मनूने कांस्य पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. तर कोरियन खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले. या प्रकारात पदक जिंकणारी मनू ही पहिलीच भारतीय खेळाडू ठरली. ३० जुलै, मंगळवार : मनू भाकरने सरबजोत सिंगच्या साथीने कांस्य पदक जिंकून एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू बनण्याचा मान पटकावला. मनू आणि सरबजोतने शूटींगच्या १० मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात कांस्य पदकावर निशाणा साधला.३ ऑगस्ट, शनिवार : २५ मीटर महिलांच्या पिस्तूल प्रकारात पदक जिंकून मनू भाकरने पदकाची हॅटट्रिक मारली. तिने शुक्रवारी ५९० गुणांसह अंतिम फेरीचे तिकीट मिळवले होते. शनिवारी झालेल्या अंतिम फेरीत मनूला अपयश आल्याने पदकापासून एक पाऊल दूर राहावे लागले.