Manu Bhaker Neeraj Chopra: भारताचा 'गोल्डन बॉय' अशी ओळख असणारा नीरज चोप्रा याला यंदाच्या हंगामात अद्याप तरी सुवर्णवेध घेता आलेला नाही. ऑलिम्पिक स्पर्धेत पाकिस्तानच्या अर्शद नदीममुळे सुवर्णपदकाने नीरजला हुलकावणी दिली. त्यावेळी त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पण डायमंड लीग ( Diamond League 2024 ) स्पर्धेत नीरज नक्कीच सुवर्णकमाई करेल अशी आशा भारतीयांना होती. पण ती आशाही पूर्ण झाली नाही. नीरजला डायमंड लीग मध्ये केवळ एका सेंटीमीटरच्या फरकाने सुवर्णपदक गमवावे लागले. त्यानंतर नीरजने आपल्या दुखापतीची माहिती दिली. त्यावर पॅरिस ऑलिम्पिकमधील दुहेरी पदक विजेती नेमबाज मनू भाकर हिने नीरजसाठी खास संदेश दिला.
डायमंड लीग स्पर्धेत ग्रेनाडाच्या अँडरसन पीटर्सने ९०.६१ मीटर भाला फेकत सुवर्णपदक पटकावले. नीरज चोप्राने देखील ऑलिम्पिकमध्ये सेट केलेला स्वत:चा विक्रम मागे टाकला. पण नीरज चोप्राचा बेस्ट थ्रो ८९.४५ मीटर इतकाच गेला. पण विशेष म्हणजे दुखापतीने त्रस्त असतानाही त्याने कामगिरी करुन दाखवली. त्यानंतर मनू भाकरने त्याला खास संदेश दिला. "नीरज चोप्रा, नुकत्याच संपलेल्या २०२४च्या हंगामातील तुझ्या उत्तम कामगिरीबाबत तुझे मन:पूर्वक अभिनंदन. तुझी दुखापत लवकर बरी होवो. तू लवकर तंदुरूस्त हो. आगामी काळात तुला आणखी यश मिळू दे," असे ट्विट मनू भाकरने केले.
डायमंड लीग स्पर्धेतील नीरजची कामगिरी
डायमंड लीग स्पर्धेतील अखेरचा थ्रो नीरजने लांब अंतरावर फेकत एक नवा विक्रम सेट केला. पहिल्या प्रयत्नात नीरजने ८२.१० मीटर अंतरावर भाला फेकला होता. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने आणखी जोर लावत ८३.२१ मीटर अंतरावर भाला फेकला. तिसऱ्या आणि चौथ्या प्रयत्नात त्याने अनुक्रमे ८३.१३ आणि ८२.३४ अंतरावर भाला फेकला. पाचव्या प्रयत्नात ८५.५८ मीटर भाला फेकल्यानंतर शेवटच्या प्रयत्नात मात्र त्याने ८९.४९ मीटरसह बेस्ट थ्रोची नोंद केली. या थ्रो ने त्याला रौप्यपदक मिळवून दिले.