नवी दिल्ली : जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेनंतर बर्गिंहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू आपला दम दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. जागतिक स्पर्धेत नीरज चोप्राने ( Neeraj Chopra) भालाफेकीत रौप्यपदक जिंकून भारताचा १९ वर्षांतील पदकाचा दुष्काळ संपवला. आता राष्ट्रकुल स्पर्धेत नीरज विक्रमी भालाफेकीसह सुवर्णपदकसाठी सज्ज झाला आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत ७० हून अधिक देश सहभागी होणार आहेत, तर तब्बल २१५ भारतीय खेळाडू यावेळी २८ जुलैपासून सुरू होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत सहभाग घेणार आहेत. डबल ऑलिम्पिक मेडलिस्ट पी.व्ही सिंधू, नीरज चोप्रा, मनिका बत्रा यांसह अनेक भारतीय स्टार खेळाडू आपली प्रतिभा दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण स्पर्धेचे वेळापत्रक.
- बॅडमिंटन स्पर्धेचे सामने २९ जुलै पासून सुरू होतील जे ८ ऑगस्टपर्यंत सुरू राहतील. यामध्ये भारतीय खेळाडू पी.व्ही सिंधू, गायत्री गोपीचंद, लक्ष्य सेन, किदांबी श्रीकांत, सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी यांच्यावर सर्वांच्या नजरा असतील. हे सर्व सामने संध्याकाळी ५ वाजता सुरू होतील.
- बॉक्सिंगच्या सामन्यांचा थरार २९ जुलै ते ७ ऑगस्ट दरम्यान पार पडणार आहे. भारताचे बॉक्सर रात्री ९ वाजल्यापासून प्रतिस्पर्धी खेळाडूला चितपट करण्यासाठी मैदानात उतरतील. निकहत जरीन, लवलीना बोरेगोहन यांच्याकडून भारतीयांना अपेक्षा असतील.
- आपली ताकद दाखवण्याची स्पर्धा अर्थात वेटलिफ्टिंगचे सामने ३० जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान पार पडतील. विशेष म्हणजे हे सामने सकाळी ५ वाजता सुरू होतील. टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक विजेती मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा या पदकाच्या प्रबळ दावेदार असणार आहेत.
- रेसलिंगचे सामने ५ आणि ६ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७.३० वाजल्यापासून खेळवले जातील. बजरंग पुनिया, विनेश फोगाट, साक्षी मलिक यांच्यावर संपूर्ण देशाची नजर असेल.
- ॲथलेटिक्सचे सामने ३० जुलै ते ऑगस्ट दरम्यान सकाळी १० वाजल्यापासून खेळवले जातील. ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा, एम श्रीशंकर, हिमा दास, दुती चंद किताब पटकावणार का हे पाहण्याजोगे असेल.
- भारतीय क्रिकेट संघ देखील कॉमनवेल्थ गेम्सचे आव्हान पेलण्यासाठी सज्ज झाला आहे. २९ जुलै ते ७ ऑगस्ट दरम्यान सकाळी ११ वाजल्यापासून क्रिकेटच्या सामन्याचा थरार रंगणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे ३१ जुलै रोजी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. ६ ऑगस्ट रोजी उपांत्यफेरी तर ७ ऑगस्टला अंतिम सामना खेळवला जाईल.
- हॉकीचे सामने २९ जुलै पासून ८ ऑगस्ट दरम्यान खेळवले जातील. भारतीय पुरूष आणि महिला संघासोबत ग्रुपमध्ये घाना, इंग्लंड, कॅनाडा आणि वेल्स हे संघ आहेत. महिला आणि पुरूष दोन्ही संघांचे सामने सायंकाळी ७.३० वाजल्यापासून सुरू होणार आहेत.
- सायकलिंगचे सामने २९ जुलै पासून सुरू होतील. भारताकडून या स्पर्धेसाठी १३ खेळाडू रिंगणात असतील. पुरूषांमधून रोनाल्डो संघाचे नेतृत्व करेल, तर महिलांच्या गटाची धुरा मयुरी लूटेकडे असेल.
- जूडोच्या सामन्यांचा थरार १ ते ३ ऑगस्ट दरम्यान होईल. भारताने यामध्ये ३ रौप्य आणि ५ कांस्य पदकांसह एकूण ८ पदके जिंकली आहेत. मात्र अद्यापही सुवर्ण पदक भारताच्या वाट्याला आले नाही. सुशिला संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे त्यामुळे तिच्या कडून भारतीयांना सुवर्ण पदकाची अपेक्षा असणार आहे. सुशिलाने २०१४ मध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्य पदक जिंकून इतिहास रचला होता.
- स्क्वॅशचे सामने २९ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान पार पडतील. या खेळामध्ये भारताच्या खात्यात एकूण ३ पदकं आहेत. दिपीका पल्लीकल, जोशना चिनप्पा यांनी सलग पदके जिंकून सर्वांचे लक्ष वेधले आहे. या सामन्यांचा थरार संध्याकाळी ४.३० वाजल्यापासून सुरू होईल.
- टेबिल टेनिसचे सामने २९ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान खेळवले जातील. शरत कमल, जी साथियान, मनिका बत्रा पुन्हा एकदा नवीन विक्रम करण्यासाठी सज्ज आहेत. हे सर्व सामने दुपारी २ वाजल्यापासून सुरू होतील.