ऑनलाइन लोकमत
टॉन्टन, दि. 29 - भारतीय महिला संघाने महिला क्रिकेट विश्वचषकामध्ये विजयी घोडदौड कायम राखली आहे. स्मृती मंधानाने केलेल्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजवर सात विकेट राखून दणदणीत विजय मिळवला. वेस्ट इंडिजने विजयासाठी दिलेले 184 धावांचे आव्हान भारतीय संघाने 42.3 षटकांत अवघ्या तीन विकेटच्या मोबदल्यात पार केले.
वेस्ट इंडिजला अवघ्या 184 धावांत रोखल्यावर माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. गेल्या सामन्यात दणकेबाज खेळी करणारी पूनम राऊत शून्यावर आणि दीप्ती शर्मा 9 धावांवर बाद झाली. मात्र दोन विकेट झटपट माघारी परतल्यावर शतकवीर स्मृती मंधाना (नाबाद 106) आणि मिताली राऊत (46) यांनी तिसऱ्या विकेटसाठी 108 धावांची भागीदारी करत भारताचा विजय निश्चित केला. मिताली 46 धावा काढून बाद झाली. त्यानंतर स्मृती मंधाना आणि मोना मेश्राम यांनी (18) भारताच्या विजयाची औपचारिकता पार पाडली.
तत्पूर्वी भारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर भारताच्या भेदक माऱ्यासमोर वेस्ट इंडिजचा महिला संघ फार तग धरू शकला नाही. त्यामुळे त्यांना निर्धारीत 50 षटकात 8 बाद 183 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून दीप्ती शर्मा, पूनम यादव आणि हरमनप्रीत कौर यांनी प्रत्येकी दोन तर एकता बिस्ट हिने एक बळी टिपला.