आशियाई स्पर्धेसाठी मारियाला संधी!
By admin | Published: September 01, 2014 9:33 PM
पंचगिरीसाठी सज्ज : दोन भारतीय महिलांची निवड
पंचगिरीसाठी सज्ज : दोन भारतीय महिलांची निवडपणजी : दक्षिण कोरियातील इंचिओन येथे होणार्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतातील दोन महिला पंचांची निवड झाली आहे. त्यात देशातील पहिली महिला पंच असलेल्या गोव्याच्या मारिया रिबेलो हिचा समावेश आहे. मारिया ही सध्या भारतातील सर्वात अनुभवी पंच आहे. मारियासोबत उव्हेना फर्नांडिस हिचीसुद्धा एशियन फुटबॉल कन्फडरेशन (एएफसी)ने आशियाई स्पर्धेतील सामन्यांच्या निरीक्षणासाठी, तसेच पंचगिरीसाठी निवड केली आहे. स्पर्धेत ४५ देशांचा सहभाग असेल.४२ वर्षीय मारिया हिने भारताच्या वरिष्ठ महिला संघाचे नेतृत्व केले आहे, तसेच ती गोव्यातील प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धा, आय-लीग आणि संतोष चषक स्पर्धेत नेहमी पंचगिरीची जबाबदारी सांभाळते. आशियाई स्पर्धेत सहभागाची ही तिची दुसरी संधी आहे. यापूर्वी, ती एक खेळाडू म्हणून बँकॉक येथे १९९८ मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत मैदानात उतरली होती. एक अधिकारी म्हणून मारिया प्रथमच या स्पर्धेचा भाग बनणार आहे. त्यामुळे ही जबाबदारी आपल्यासाठी खूप वेगळी असेल; पण ती उत्तमरीत्या पार पाडू, असा विश्वास तिला आहे. ती म्हणाली, स्पर्धेपूर्वी आम्ही फिटनेस टेस्ट दिली आहे. मी रोज सराव केला आणि स्वत:ला फिट ठेवले. या स्पर्धेत सर्वात मोठे आव्हान असेल ते भाषेचे; पण यासाठीही एक योजना आखली आहे. त्याद्वारे हा प्रश्न दूर होईल, असेही मारियाने सांगितले.दुसरीकडे, उव्हेना फर्नांडिसचा हा प्रथमच आशियाई दौरा आहे. त्यामुळे ती उत्साहित आहे. माझ्यावर दडपण नाही; पण एक आव्हान जरूर आहे; कारण एवढ्या मोठ्या स्पर्धेत सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ असेल. भारतातील सुब्रतो चषक स्पर्धेत गेल्या पाच-सहा वर्षांपासून पंचगिरी करण्याचा अनुभव आहे. त्याची मदत होईल, असे उव्हेनाने सांगितले.