नवी दिल्ली : राष्ट्रकुल स्पर्धेदरम्यान केलेल्या चुकांमध्ये सुधारणा केली असून आता गुरुवारपासून प्रारंभ होत असलेल्या स्पर्धेत पदक जिंकत ते अपयश धुवून काढण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे मत विश्व महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पदार्पण करणारी भारतीय बॉक्सर लवलिना बोरगोहेनने (६९) व्यक्त केले.
भारतीय महिला बॉक्सिंगची स्टार एम.सी. मेरीकोम येथे सहावे विश्वविजेतेपद पटकावण्यासाठी कसून तयारी करीत आहे. ती अन्य ज्युनिअर बॉक्सर्ससाठी प्रेरणास्रोत ठरत आहे. मेरीकोम शिबिरामध्ये सरावादरम्यान अन्य बॉक्सर्सला वेळ काढून टीप्स देत त्यांच्या उणिवा दूर करण्यासाठी प्रयत्नशील असते.
लवलिना म्हणाली, ‘मेरीकोम शिबिरादरम्यान नेहमी आमची मदत करण्यासाठी सज्ज असते. तसे प्रशिक्षक आमच्यासोबत असतात, पण जर आम्ही चुकीचा पंच मारला, तर मेरीकोम आम्हाला शिकवते. तिला प्रदीर्घ अनुभव आहे. ती रिंगमध्ये उतरण्यापूर्वी मानसिकदृष्ट्या मजबूत करण्यावर भर देते. त्याचप्रमाणे रिंगमध्ये तुमचे वर्तन कसे असावे, याबाबत मार्गदर्शन करते. ती सर्वांना प्रेरित करते. तिचा सराव चांगला असून ती निश्चितच सहाव्यांदा विश्वविजेतेपद पटकावेल. मीसुद्धा तिच्याप्रमाणे कामगिरी करण्यास प्रयत्नशील आहे. ती सर्व महिला बॉक्सर्सचे प्रेरणास्रोत आहे.’
वर्षाच्या सुरुवातीला इंडिया ओपनमध्ये वेल्टरवेट गटात सुवर्णपदक पटकावणाऱ्या लवलिनाला गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत पदकाची प्रबळ दावेदार मानले जात होते, पण त्यात ती अपयशी ठरली. याबाबत विचारले असता ती म्हणाली, ‘मी माझ्यातर्फे सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. निकाल २-३ असा राहिला. मी काही चुका केल्या. त्यामुळे माझे पदक हुकले. आता मात्र मी त्या चुका सुधारल्या आहेत. सराव चांगला होत असून मायदेशात खेळताना भारताला पदक मिळवून द्यावेच लागेल.’ आसामच्या या बॉक्सरने आशियाई महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप आणि प्रेसिडेंट््स कपमध्ये कांस्यपदकाचा मान मिळवला होता.
चीन आणि कजाकस्तानच्या बॉक्सर्सला (सर्व वजनगटात) प्रबळ दावेदार असल्याचे सांगत लवलिना म्हणाली,‘माझ्या मते या दोन देशांचे बॉक्सर्स सर्वच वजनगटात कडवी लढत देतील, पण आम्हाला मायदेशात खेळण्याचा नक्कीच लाभ मिळेल.’ शिबिरादरम्यान मानसिक कणखरता मिळवण्यासाठी योग किंवा ध्यान यासारख्या बाबींचा अवलंब करण्यात येतो का, याबाबत बोलताना लवलिना म्हणाली,‘नाही, याचा अवलंब केला जात नाही. पण, आमच्याकडे मनोचिकित्सक असून आठवड्यात एकदा त्यांचे सेशन होते. स्पर्धेपूर्वी दडपण करण्यासाठी मन कसे शांत ठेवायचे, याचे मार्गदर्शन केले जाते.’
पूर्वीच्या तुलनेत आता सराव चांगला होत असल्याचे लवलिना म्हणाली. तिने पुढे सांगितले की,‘आता प्रत्येक सदस्यासोबत जवळजवळ एक प्रशिक्षक असतो. खेळाच्या प्रत्येक विभागवर लक्ष केंद्रित करीत सराव दिला जातो. अन्य देशांचे संघ बघता भारताचा संघ सर्वोत्तम असल्याचे भासत आहे.’ नवी दिल्लीतील आयजी स्टेडियममध्ये १५ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित १० व्या विश्व महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये ७० देशांचे बॉक्सर्स सहभागी होण्याची आशा आहे.