नवी दिल्ली : पाचवेळेची विश्व चॅम्पियन बॉक्सर एम. सी. मेरिकोमने माझ्याबाबत केलेले आरोप खोडसाळ आणि बिनबुडाचे असल्याचे स्पष्टीकरण ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य विजेती बॉक्सर पिंकी जांगडा हिने दिले. मेरीच्या आरोपांमुळे युवा खेळाडूंवर विपरीत परिणाम होईल, असेही पिंकी म्हणाली.पिंकी म्हणाली,‘ निवडप्रक्रियेत अनेक जणांचा समावेश असतो शिवाय व्हिडिओ चित्रण केले जाते. जो सर्वोत्तम असतो त्याचीच निवड केली जाते. मेरिकोमला सरकारने रियो आॅलिम्पिकच्या तयारीसाठी अन्य खेळाडूंच्या तुलनेत अधिक रक्कम दिली आणि साईच्या रेकॉर्डमध्ये याची नोंद आहे. मेरिकोमने असे आरोप केल्यास युवा खेळाडूंच्या कामगिरीवर विपरीत परिणाम होईल.’पिंकी पुढे म्हणाली,‘ मी २०१४ च्या कॉमनवेल्थ गेम्स ट्रायलमध्ये मेरिकोमला नमवून ग्लास्गोला गेले होते. इंचियोन आशियाडच्या ट्रायलमध्ये तिने मला पराभूत करीत स्थान पटकविले होते. त्यावेळी निवडप्रक्रियेवर तिचा आक्षेप नव्हता. आता अचानक मी पूर्वेकडील असल्याने मला निवडीत फटका बसल्याची तिला प्रचिती झाली आहे.’ देशासाठी खेळण्याची संधी मिळाली त्या दिवशी मेरीच्या डोक्यात असे विचार का आले नाहीत, असा उलट सवाल पिंकीने केला.मेरिकोमने दोन दिवसांपूर्वी मुंबईतील एका कार्यक्रमात भारतीय निवडकर्त्यांवर बॉक्सिंग निवड आणि ट्रायल्समध्ये क्षेत्रीय अन्याय केला जात असल्याचा आरोप केला होता. याशिवाय पिंकीशी तिची तुलना करताच मेरी चक्क भडकली होती.(वृत्तसंस्था)
मेरिकोमचे आरोप बिनबुडाचे
By admin | Published: September 28, 2015 1:35 AM