मुंबई : "यशाचे शिखर सर करण्यासाठी जिद्द, मेहनत आणि इच्छाशक्ती जितकी गरजेची असते तितकाच आपल्या कुटुंबियांचे पाठीशी राहणे महत्त्वाचे असते. सारे जग विरोधात गेले तरी त्याच जोरावर आपल्याला ध्येय गाठण्याची ऊर्जा मिळते," शरिरसौष्ठवपटू सुनीत जाधव हे सांगत होता. भारताला २३ वर्षानंतर सुनीतले आशिया स्पर्धेत चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हा खिताब जिंकून दिला. एरवी थोड्याश्या यशाने हवेत उडणारे खेळडूंची उदाहरण समोर असताना सुनीत मात्र एवढा मोठा पराक्रम गाजवूनही पाय जमिनीवर रोवून ठामपणे उभा आहे.
ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर आपसूकच येणारा अहंकार, त्याच्या बोलण्यातून अजिबात जाणवत नव्हता. घरच्यांकडून मिळालेल्या संस्कारामुळे आणि परिस्थितीने शिकवलेल्या प्रत्येक धड्यामुळे हा नम्रपणा त्यामध्ये आला असवा. म्हणूनच या यशाचे श्रेय हे प्रत्येकाचे आहे, असे तो सांगतो. तो म्हणाला," माझे कुटुंबीय, मित्र परिवार, संघटनेतील प्रत्येकाचे या यशामागे श्रेय आहे."
हा पाहा सुनीत जाधवची खास मुलाखत
कुटुंबियांविषयी सुनीत जरा जास्तच हळवा आहे आणि त्याला कारणही तसेच आहे. "आशिया चॅम्पियन्स स्पर्धेसाठी मी गेली वर्ष-दीड वर्ष प्रचंड मेहनत घेतली. मागील सहा महिने मी आई-वडिलांना भेटलोही नाही. त्यांची ख्याली-खुशालीही मला माहित नव्हती. स्पर्धेदरम्यान मला मानसिक ताण होऊ नये, याची काळजी त्यांनी घेतली. मला वरर्काऊटमुळे त्यांना भेटता येत नव्हते, तर मला भेटायला ते पनवेलवरून दादरला यायचे," असे सुनीतने सांगितले.
वडिलांचे ऑपरेशन अन्.... सुनीतने यशाची शिखरं पादाक्रांत करावी यासाठी त्याच्या घरच्यांनी खूप त्याग केले. सुनीतला मानसिक त्रास होऊ नये म्हणून अनेक गंभीर गोष्टी त्यांनी त्याच्यापासून लपवल्या. याविषयी सांगताना सुनीतचे डोळे पाणावले, तो म्हणाला," दोन वर्षांपूर्वी वडिलांचे ट्युमरचे ऑपरेशन झाले त्यावेळी मी त्यांच्यासोबत नव्हतो. मी 'मीस्टर इंडिया'साठी तयारी करत होतो. मला ऑपरेशनबाबत कोणी काहीच कळू दिले नाही. ( हुंदके देत देत ). घरच्यांनाही माहित आहे की मी किती मेहनत घेतोय. म्हणून ते अशा बऱ्याच गोष्टी माझ्यापासून लपवतात."
बायको असावी तर अशी.... सुनीतच्या यशामागे आणखी एका व्यक्तीचा महत्वाचा वाटा आहे आणि ती म्हणजे पत्नी स्वप्नाली हीचा. प्रत्येक स्पर्धेला ती सुनीत सोबत असते. त्याच्या डायटची काळजी ती घेते. सावली सारखी ती सुनीतसोबत असते. सुनीतच्या कारकिर्दीसाठी तिने चार वर्षांपूर्वी IT कंसल्टंटची नोकरी सोडली. दादरला १८० स्क्वेअर फुटच्या भाड्याच्या घरात सुनीत पत्नीसह राहतो.