नवी दिल्ली : भारताची अव्वल महिला बॉक्सर मेरी कोमने सहाव्यांदा विश्व अजिंक्यपद स्पर्धा जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. हा ऐतिहासिक विजय मेरीने आपल्या देशाला समर्पित केला आहे. हा ऐतिहासिक विजय माझ्या देशाचा आहे. हा विजय मी भारत आणि देशवासियांना समर्पित करते, असे मेरीने सामना जिंकल्यावर सांगितले.
सुपरस्टार एम. सी. मेरी कोम (४८ किलो) हीने आपल्या सहाव्यांदा जगज्जेतेपदाला गवसणी घातली आहे. विश्व अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीत मेरीने युक्रेनच्या हॅना ओखोटाला 5-0 असे पराभूत करत जेतेपदाला गवसणी घातली आणि इतिहास रचला.
मेरीने तब्बल 16 वर्षांपूर्वी या स्पर्धेत पहिले जेतेपद पटकावले होते. मेरी आता 35 वर्षांची आहे आणि तिचे हे सहावे जेतेपद ठरले आहे. मेरीने 2001, 2002, 2005, 2006, 2008, 2010 या वर्षांमध्ये यापूर्वी जेतेपद पटकावले होते.