नवी दिल्ली : सुपरस्टार एम. सी. मेरी कोम (४८ किलो) हीने आपल्या सहाव्यांदा जगज्जेतेपदाला गवसणी घातली आहे. विश्व अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीत मेरीने युक्रेनच्या हॅना ओखोटाला 5-0 असे पराभूत करत जेतेपदाला गवसणी घातली आणि इतिहास रचला.
अंतिम फेरीत मेरी चांगलीच आक्रमक पाहायला मिळाली. पहिल्या फेरीपासून तिने जोरदार आक्रमणाला सुरुवात केली. पहिल्या फेरीत तिने ओखोटाला हतबल करून सोडले होते. या पहिल्या फेरीनंतर मेरीचे मनोबल कमालीचे उंचावलेले दिसले आणि या गोष्टीचा फायदा तिला पुढील फेऱ्यांमध्ये झाला.
मेरीने तब्बल 16 वर्षांपूर्वी या स्पर्धेत पहिले जेतेपद पटकावले होते. मेरी आता 35 वर्षांची आहे आणि तिचे हे सहावे जेतेपद ठरले आहे. मेरीने 2001, 2002, 2005, 2006, 2008, 2010 या वर्षांमध्ये यापूर्वी जेतेपद पटकावले होते.
या विजयानंतर मेरी म्हणाली की, " माझ्यासाठी हा विजय सर्वात महत्वाचा आहे. कारण या विजयाने 2020 साली होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये मला स्थान मिळणार आहे. त्यामुळे हा विजय माझ्यासाठी मोलाचा ठरला आहे. आतापर्यंत मला बऱ्याच जणांनी पाठिंबा दिला, त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छिते. "