होचिमिन्ह सिटी (व्हिएतनाम) : एम.सी. मेरी कोमने आशियाई महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये सहावे पदक निश्चित केले आहे. यात तीन भारतीय महिलांनी या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.मेरी कोम सोबत शिक्षा (५४ किलो) आणि प्रियांका चौधरी (६० किलो)ने आपले पदक निश्चित केले. पाच वेळची विश्वविजेती खेळाडू आणि आॅलिम्पिक कांस्यपदक विजेती मेरी कोम हिने ४८ किलो लाइट फ्लायवेट गटात उपांत्यपूर्व फेरीत तैवानची खेळाडू मेंग ची पिन ला पराभूत करत अंतिम चारमध्ये जागा मिळवली.मेरी कोम हिने या आधीच्या पाच स्पर्धांत चार वेळा सुवर्ण आणि एका वेळी रौप्यपदकाची कमाई केली आहे. उपांत्य फेरीत तिचा सामना जपानच्या सुबासा कोमुरा हिच्यासोबत होईल.मेरी कोम हिने एका वर्षापेक्षा जास्त काळानंतर आपले पदक निश्चित केले आहे. त्यामुळे तिचे मनोबल नक्कीच वाढले असेल. रियो आॅलिम्पिकसाठीची पात्रता मिळवण्यात तिला अपयश आले होते. शिक्षा हिने उजबेकिस्तानच्या फेरांगिज खोशिमोवा विरोधात आक्रमक खेळ केला. पंचांच्या सर्वसंमतीने तिला विजयी घोषित करण्यात आले.शिक्षाची लढत उपांत्य फेरीत तैवानच्या लीन यू टींगसोबत होणार आहे. प्रियांका हिने श्रीलंकेच्या दुलानजानी लंकापूरायालागे हिला ५ -० ने पराभूत केले. (वृत्तसंस्था)
मेरी कोम उपांत्य फेरीत, आशियाई महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 3:35 AM