नवी दिल्ली - सहा विश्वचषकांची मानकरी’ असलेली भारताची चॅम्पियन बॉक्सर एमसी मेरी कोम व सिमरनजित कौर यांनी रविवारी इंडोनेशियातील लाबुऑन बाजो येथे सुरू असलेल्या प्रेसिडेंट कप मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. भारतीय मुष्टीयोद्धयांनी या स्पर्धेत सात सुवर्ण व दोन रौप्यपदक पटकावली.
या स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचलेल्या चारीही भारतीय महिला स्पर्धकांनी सुवर्णपदक मिळविले. पुरुषांच्या गटांत तीन सुवर्ण मिळाली. दोघांना अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ऑलिम्पिकची कांस्यविजेती असलेल्या मेरी कोमने अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाची एप्रिल फ्रँक्स हिच्यावर ५-० ने सहज विजय साजरा केला. सिमरनजितने अंतिम सामन्यात आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक विजेती इंडोनेशियाची हसानाह हुसवातुनला ५- ० असे पराभूत केले. आसामची युवा खेळाडू जमुना बोरोने ५४ किलोगटांत इटलीच्या ग्युलिया लमाग्नाला ५-० असे पराभूत केले. तर ४८ किलो वजनगटात मोनिकाने इंडोनेशियाच्या एनडांगला पराभूतकरत सुवर्णपदक मिळविले.
पुरुषांच्या गटात अंकुश दाहिया (६४), नीरज स्वामी (४९), अंनत चोपाडे (५२) यांनी सुवर्णपदक पटकावले. नीरजला अंतिम सामन्यातफिलिपाईन्सच्या मकाडो ज्युनियर रामेल याच्याकडून पराभूत व्हावे लागले. गौरव बिधुडी व इंडिया ओपनचा विजेता दिनेश डागर यांनाअंतिम फेरीत पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ३६ वर्षांच्या मेरीने मे मध्ये इंडिया ओपनमध्ये देखील सुवर्ण जिंकले होते. विश्व चॅम्पियनशिपआधी काही बाऊट खेळून स्वत:ला फिट राखण्याची तिची योजना आहे. विश्व चॅम्पियनशिपचे आयोजन ७ ते २१ सप्टेंबर या कालावधीत होईल. इंडोनेशियात मी देशासाठी सुवर्णपदक जिंकले आहे. जिंकण्याचा अर्थ असतो की, तुम्ही आणखी जास्त मेहनत व अधिक प्रयत्न करण्यासाठी तयार आहात. मी प्रशिक्षक, स्टाफ त्याच बरोबर क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांचे आभार मानते. - मेरी कोम