बर्लिन येथे पार पडलेल्या जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय शिलेदारांनी सोनेरी कामगिरी करून तिरंग्याची शान वाढवली. सांघिक आणि वैयक्तिक स्पर्धांमध्ये सुवर्ण जिंकून भारतीय तिरंदाजांनी जर्मनीच्या धरतीवर भारताचा गौरव केला. खरं तर शुक्रवारी ज्योती सुरेखा वेन्नम, अदिती स्वामी आणि परनीत कौर यांनी जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताला प्रथमच सुवर्णपदक जिंकून दिले. त्यांनी महिला कम्पाऊंड सांघिक गटाच्या अंतिम सामन्यात मेक्सिकोवर २३५-२२९ असा विजय मिळवला. तर, शनिवारी अदितीने सोनेरी कामगिरी करत वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकले. तिने अंतिम फेरीत मेक्सिकोच्या अँड्रिया बेसेरा हिला १४९-१४७ ने पराभूत करून कंपाऊंड तिरंदाजीमध्ये विश्वविजेतेपद मिळवले.
दरम्यान, भारतीय खेळाडूंनी केलेल्या कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने देखील या ऐतिहासिक कामगिरीनंतर भारतीय खेळाडूंचे कौतुक केले. जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी अविश्वसनीय कामगिरी केली असल्याचे सचिनने म्हटले. तसेच महिला कम्पाऊंड संघातील खेळाडू (ज्योती, अदिती आणि परनीत) यांनी सांघिक कामगिरी करून सुवर्ण पदक जिंकले. पुरूष वैयक्तिकमध्ये ओजस देवतळेने सोनेरी कामगिरी केली. याशिवाय महिला वैयक्तिकमध्ये अदिती आणि ज्योती यांनी पदकांना गवसणी घातली. भारताच्या महिला त्रिकूटाने फायनल जिंकली, त्यानंतर अदितीने १७ व्या वर्षी वैयक्तिक विश्वविजेतेपद पटकावले आणि त्यानंतर ओजसने अचूक स्कोअर करून इतिहास रचला. बर्लिनमध्ये आमच्या तिरंदाजांनी भारताचा गौरव केला, अशा शब्दांत क्रिकेटच्या देवाने खेळाडूंच्या कामगिरीवर कौतुकाची थाप दिली.
अदिती स्वामीची ऐतिहासिक कामगिरीमूळची सातारची असलेल्या मराठमोळ्या अदिती स्वामीने वैयक्तिक सुवर्ण जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. लक्षणीय बाब म्हणजे १७ वर्षांची अदिती गोपीचंद स्वामी ही भारताची पहिली विश्वविजेती ठरली आहे. अदितीने सोनेरी कामगिरी करत वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकले. तिने शनिवारी जागतिक तिरंदाजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत मेक्सिकोच्या अँड्रिया बेसेरा हिला १४९-१४७ ने पराभूत करून कंपाऊंड तिरंदाजीमध्ये विश्वविजेतेपद मिळवले.
ओजस देवतळेचा 'सुवर्ण' वेधजागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय शिलेदारांनी चमकदार कामगिरी करून सुवर्ण पदकाला गवसणी घातली. महिलांनी मिळवलेल्या घवघवीत यशानंतर ओजस देवतळेने देखील सोनेरी कामगिरी करत सुवर्ण पटकावले. लक्षणीय बाब म्हणजे ओजस देवतळे हा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष तिरंदाज ठरला आहे. अंतिम फेरीत त्याने १५० गुण मिळवून सुवर्ण पदकावर शिक्कामोर्तब केला.
त्रिकूटाचा सोन्यावर निशाणाशुक्रवारी भारताच्या महिला खेळाडूंनी सांघिक अंतिम फेरीत देशासाठी पहिले सुवर्ण जिंकले. ज्योती सुरेखा वेन्नम, अदिती स्वामी आणि परनीत कौर यांनी जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताला प्रथमच सुवर्णपदक जिंकून दिले. त्यांनी महिला कम्पाऊंड सांघिक गटाच्या अंतिम सामन्यात मेक्सिकोवर २३५-२२९ असा विजय मिळवला.