रोहित नाईकलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : चारशेहून अधिक धावाचा पाऊस पडलेल्या चुरशीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला गुरुवारी घरच्या मैदानावर किंग्ज इलेव्हन पंजाबविरुध्द 7 धावांनी निसटता पराभव पत्करावा लागला. विशेष म्हणजे यंदाच्या सत्रात धावांचा पाठलाग करताना मुंबईचा हा केवळ दुसरा पराभव ठरला. तर, 7 वेळा मुंबईकरांनी बाजी मारली. तसेच वानखेडेवरही यंदाच्या मोसमात त्यांचा हा केवळ दुसरा पराभव ठरला.हा सामना खास करुन पंजाबसाठी निर्णायक होता. प्ले आॅफ गाठण्यासाठी त्यांना प्रत्येक सामना जिंकणे अनिवार्य असून बलाढ्य मुंबईविरुध्द त्यांनी रडतखडत का होईना पण विजय मिळवला हे महत्त्वाचे. आता त्यांना आपल्या अखेरच्या सामन्यात रायझिंग पुणे सुपरजायंट्सला नमवणे आवश्यक असेल. त्याचवेळी 15 गुणांसह चौथ्या स्थानी असलेल्या गतविजेते सनरायझर्स हैदराबादचा पराभवही पंजाबसाठी महत्त्वाचा आहे हैदराबादचा अखेरचा सामना गुजरात लायन्सविरुद्ध शनिवारी होईल. हा सामना हैदराबादने जिंकल्यास पंजाबचे आव्हान संपुष्टात आले. तसेच अशा परिस्थितीमध्ये पंजाबचा पुण्याविरुद्धचा सामना केवळ औपचारीकता राहिल.पंजाबने दिलेल्या 232 धावांचे भलेमोठे आव्हान घेऊन उतरलेल्या मुंबईकरांनी आक्रमक सुरुवात केली. लेंडल सिमन्स - पार्थिव पटेल यांनी सावध परंतु मजबूत सुरुवात करताना 99 धावांची भागीदारी केली. यानंतर ठराविक अंतराने बळी गेल्याने मुंबईकरांच्या वेगाला ब्रेक लागला. सिमन्सने पुन्हा एकदा आक्रमक अर्धशतक झळकावून आपली उपयुक्तता सिध्द केली. परंतु, नितिश राणा , कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात परतल्याने मुंबईकर दडपणाखाली आले आणि याचा परिणाम धावगतीवर झाला. येथेच सामना पंजाबच्या दिशेने झुकला.परंतु, हार्दिक पांड्या - केरॉन पोलार्ड यांनी अखेरपर्यंत हार न मानता पंजाबच्या गोलंदाजांना चोपण्यास सुरुवात केली. या दोघांनी बघता बघता सामना मुंबईच्या अवाक्यात आणलाही. मात्र, संदीप शर्माने हार्दिकला बाद करुन मुंबईला मोठा धक्का दिला. यानंतरही पोलार्डने मुंबईला विजयी मार्गावर ठेवले. अखेरच्या षटकात 16 धावांची गरज असताना मोहित शर्माने केवळ 8 धावा देत निर्णयक मारा केला. तत्पूर्वी, रिध्दिमान साहाच्या शानदार 93 धावांच्या जोरावर पंजाबने मुंबईकरांना मजबुत चोपले. सुरुवातीला केलेला सुमार मारा आणि त्यासोबत क्षेत्ररक्षणामध्येही अनेक चुका केल्याने त्यांनी एकप्रकारे पंजाबच्या धावसंख्येत हातभार लावला. त्याच्यासोबत कर्णधार ग्लेन मॅक्सवेलनेही जबरदस्त तडाखा देत पंजाबला मजबूत धावसंख्या उभारण्यात मोलाचे योगदान दिले.
मुंबईकरांची झुंज अपयशी ठरली
By admin | Published: May 12, 2017 1:10 AM