पुणे : मुंबई शहरच्या शिवशक्ती आणि उपनगरच्या महात्मा गांधी या बलाढ्य संघांनी आपापल्या उपांत्य सामन्यात बाजी मारताना पुणे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या महिला गटात अंतिम फेरी गाठली. त्याचवेळी ठाण्याच्या शिवशंकरने पुरुषांची अंतिम फेरी गाठली असून, मुंबईच्या विजय क्लबचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले.खराडी येथील वि. मा. पठारे बंदिस्त मैदानात मॅटवर सुरू असलेल्या या स्पर्धेत महिलांमध्ये मुंबईकरांचे वर्चस्व राहिले. मुंबईच्या शिवशक्ती संघाने पुण्याच्या वाघेश्वर संघाचा २६-०६ असा फडशा पाडत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला शिवशक्तीने १८-३ अशी एकतर्फी आघाडी घेत सामन्याचे चित्र स्पष्ट केले. अपेक्षा टाकळे व रेखा सावंत यांनी खोलवर चढाई करून पुणेकरांना जेरीस आणले. अन्य सामन्यात मुंबई उपनगरच्या महात्मा गांधी संघाने पुण्याच्या सुवर्णयुग संघाचे आव्हान १०-५ असे परतावले. पहिल्या सत्रात महात्मा गांधी संघाने ६-३ अशी आघाडी घेतली होती. मीनल जाधवने दमदार खेळ करून संघाला अंतिम फेरीत नेले. सुवर्णयुगच्या सुमती पुजारी व सोनाली इंगळे यांनी अपयशी झुंज दिली.पुरुष गटात ठाण्याच्या शिवशंकरने अंतिम फेरी गाठताना चिपळूणच्या न्यू हिंद विजय संघाचा २३-९ असा धुव्वा उडवला. सुरुवातीला सावध खेळ करताना शिवशंकरने ५-३ अशी आघाडी घेतली होती. यानंतर मात्र त्यांनी तुफान आक्रमण करताना सामना एकतर्फी ठरवला. तर मुंबईच्या विजय क्लबला उपांत्य सामन्यात पुण्याच्या साई स्पोटर््स अॅकॅडमीविरुद्ध २३-३७ असा पराभव पत्करावा लागला. (क्रीडा प्रतिनिधी)
मुंबईकरांमध्ये रंगणार विजेतेपदाची लढत
By admin | Published: December 14, 2015 2:43 AM