ऑनलाइन लोकमत
मेलबर्न, दि. १८ - बीबीसी आणि बझफिड न्यूज या दोन नामांकित प्रसारमाध्यमांनी टेनिसमध्ये मॅचफिक्सिंग होत असल्याचा गौफ्यस्फोट केल्यामुळे आजपासून सुरु झालेल्या मोसमातील पहिल्याच ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेबद्दल संशय निर्माण झाला आहे.
मागच्या दशकात पन्नासपैकी अव्वल सोळा टेनिसपटू सट्टेबाजीतून मिळणा-या पैशांसाठी मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याचा दावा बीबीसी आणि बझफिड न्यूजने केला आहे. या अव्वल सोळा टेनिसपटूंमध्ये ग्रॅण्डस्लॅम विजेत्या टेनिसपटूंचाही समावेश आहे. विम्बलडनमधल्या तीन सामन्यांवर फिक्सिंगचा संशय असून, ज्या आठ टेनिसपटूंवर संशय आहे ते ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहभागी होणार असल्याचे वृत्तात म्हटले आहे.
ज्या १६ खेळाडूंवर संशय आहे त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. लीक झालेल्या गोपनीय फाईल्समधील माहितीच्या आधारावर बीबीसी आणि बझफिड न्यूजने हा दावा केला आहे. मॅचफिक्सिंगच्या पुराव्याकडे दुर्लक्ष केले किंवा ते दडपून टाकले असे आम्ही केलेले नाही एटीपीचे प्रमुख ख्रिस केरमोडे यांनी सांगितले.
बीबीसी आणि बझफिडचा अहवाल १० वर्षापूर्वीचा आहे. काही नवीन माहिती समोर आली तर, आम्ही नक्की चौकशी करु असे केरमोडे यांनी सांगितले. स्पर्धेच्या ठिकाणी टेनिसपटूंचे ज्या हॉटेलमध्ये वास्तव्य असते तिथे त्यांना गाठले जाते तिथे त्यांना ५० हजार डॉलर किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम ऑफर केली जाते असे बझफिडने आपल्या वृत्तात म्हटले आहे.
२००७ मध्ये जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या टेनिसपटूंचा ८७ व्या स्थानावरील टेनिसपटूने पराभव केला होता. या सामन्याची चौकशी झाली होती. मात्र सबळ पुराव्याअभावी कारवाई झाली नव्हती.