सामना क्रीडा
By admin | Published: July 12, 2014 10:06 PM
रुट, ॲन्डरसनची विश्वविक्रमी भागीदारी
रुट, ॲन्डरसनची विश्वविक्रमी भागीदारीइंग्लंडला पहिल्या डावात आघाडी : भारत दुसरा डाव १ बाद ५७नॉटिंघम : जो रुट व जेम्स ॲन्डरसन यांनी अखेरच्या विकेटसाठी केलेल्या विश्वविक्रमी भागीदारीच्या जोरावर इंग्लंडने भारताविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात ३९ धावांची आघाडी घेतली. भारताच्या पहिल्या डावातील ४५७ धावसंख्येच्या प्रत्युत्तरात खेळताना इंग्लंडने आज पहिल्या डावात ४९६ धावांची मजल मारली. पहिल्या डावात ३९ धावांनी पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या डावात आज चौथ्या दिवशी चहापानाला खेळ थांबल्या त्यावेळी १ बाद ५७ धावांची मजल मारली होती. शिखर धवन (२७) माघारी परतल्यानंतर मुरली विजय ( १९) आणि चेतेश्वर पुजारा (८) खेळपट्टीवर होते. त्याआधी, जो रुट (नाबाद १५४) आणि जेम्स ॲन्डरसन (८१) यांनी अखेरच्या गड्यासाठी १९८ धावांची विश्वविक्रमी भागीदारी नोंदविली.भुवनेश्वर कुमारने ॲन्डरसनला तंबूचा मार्ग दाखवत इंग्लंडचा डाव संपुष्टात आणला. भुवनेश्वरने कारकीर्दीत प्रथमच पाच बळी घेण्याची कामगिरी केली. भुवनेश्वरने ८२ धावांच्या मोबदल्यात ५ फलंदाजांना तंबूची वाट दाखविली. रुट व ॲन्डरसन यांनी यापूर्वीचा १० व्या गड्यासाठी ऑस्ट्रेलियाचा फिल ह्युजेस व अश्टन अगर यांच्या नावावर असलेला १६३ धावांचा विक्रम मोडला. आज चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाज बळी घेण्यासाठी संघर्ष करीत असल्याचे चित्र होते. रुट व ॲन्डरसन यांनी १११ वर्षांपूर्वी इंग्लंडतर्फे १० व्या विकेटसाठी नोंदविलेला १३० धावांच्या भागीदारीचा विक्रमही यावेळी मोडला. (वृत्तसंस्था)