मुंबई : तथास्तु ग्रुप, नालासोपारा व पालघर डिस्ट्रीक्ट कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रतिष्ठेची तिसरी महापौर चषक अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष प्रौढ गट आणि पुरुष .सांघिक गटात अनुक्रमे शरीफ शेख, श्रृती सोनावणे (प्रगती कॅरम क्लब), नवीन पाटील (यंगस्टर्स ट्रस्ट) व समाज उन्नती मंडळ ‘ब’ संघ यांनी विजेतेपद पटकाविले. ही प्रतिष्ठित महापौर चषक अजिंक्यपद कॅरम स्पर्धा कपोल स्कुल, आचोळे रोड, नालासोपारा (पूर्व) जिल्हा पालघर येथे खेळविण्यात आली.
पुरुष एकेरीच्या अंतीम फेरीच्या सामन्यात बिनमानांकित प्रगती कॅरम क्लबच्या शरीफ शेखने आक्रमक व बचावात्मक खेळाचे प्रात्यक्षिक घडवित अग्रमानांकित वसईच्या प्रमोद शर्माविरूद्ध पहिल्या गेममध्ये सहा बोर्डामध्ये २३-६ अशी आघाडी घेतली. नंतरचे दोन बोर्ड आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत २ गुण मिळवून २५-६ असा पहिला गेम जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या गेमध्ये शरीफ शेख पाचव्या बोर्डपर्यंत आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत २२-७ अशी आघाडी घेतली. नंतरच्या दोन बोर्डात प्रमोद शर्माने ५ आणि ३ गुण घेऊन १५-२२ असा पिछाडीवर होता. नंतरच्या आठव्या बोर्डमध्ये शरीफ शेखने शांत चित्ताने खेळत ३ गुण घेऊन २५-१५ असा गेम जिंकून विजेतेपदावर आपल्या नावाचे शिक्कामोर्तब केले. तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात यंगस्टार्स ट्रस्टच्या आशुतोष गिरीने दोन गेम रंगलेल्या एकतर्फी सामन्यात प्रगती कॅरम क्लबच्या कैलाश वाघेलाचा २५-१०, २५-११ असा धुव्वा उडवला.
तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या महत्त्वाच्या सामन्यात शरीफ शेखने रोमहर्षक तीन गेम रंगलेल्या लढतीत यंगस्टार्स ट्रस्टच्या आशुतोष गिरीचा ४-२५, २५-१२, २५-८ अशी कडवी झंज मोडीत काढत अंतीम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अग्रमानांकित वसईच्या प्रमोद शर्माने सरळ दोन गेम रंगलेल्या लढतीत प्रगती कॅरम क्लबच्या कैलाश वाघेलाचा २५-१७, २५-३ अशी मात करत अंतीम फेरी गाठली.
महिला एकेरी गटाच्या अंतीम फेरीच्या दोन तास रंगलेल्या सामन्यात दुसरी मानांकित प्रगती कॅरम क्लबच्या श्रृती सोनावणेने यंगस्टार्स ट्रस्टच्या अंकीता हांडेचा २५-९, २५-१७ अशी कडी झुंज मोडीत काढून विजेतेपदावर आपले नाव कोरले. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात यंगस्टार्स ट्रस्टच्या अंकीता हांडेने अग्रमानांकित यंगस्टार्स ट्रस्टच्याच वैशाली तांबेचा रोमहर्षक तीन गेम रंगलेल्या लढतीत २५-१०, १२-२५, २५-४ असा आ्श्चर्याचा धक्का देत अंतीम फेरी गाठली. पुरुष सांघिक गटाच्या अंतीम फेरीच्या सामन्यात समाज उन्नती मंडळ ‘ब’ संघाने समाज उन्नती मंडळ ‘अ’ संघावर २-१ असा निसटता विजय मिळवित अजिंक्यपदावर आपले नाव कोरले. या स्पर्धेत चार ब्रेक टू फिनिश व एक ब्लॅक टू फिनिश नोंदवले गेले.