मुंबई : सहा विश्वविजेतेपद नावावर असलेल्या बॉक्सर मेरी कोमची पद्म विभूषण पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी शिफारस करण्यात येणारी मेरी ही पहिलीच महिला खेळाडू आहे. पद्मभूषण पुरस्कारासाठी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱ्या पी व्ही सिंधूच्या नावाची, तर कुस्तीपटू विनेश फोगाट, टेबल टेनिसपटू मनिका बात्रा, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, हॉकीपटू राणी रामपाल, माजी नेमबाज सुमा शिरूर आणि गिर्यारोहक ताशी व नुंगशी मलिक या बहिणींची यांची पद्मश्री पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. क्रीडा मंत्रालयातील सूत्रांनी ही माहिती दिली.
याच यशाची पुरावृत्ती मेरीने 2018 मधील राष्ट्रकुल क्रीडा सापर्धेतही केली होती. 2012 मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरविलेली ती एकमेव भारतीय महिला बॉक्सर होती. या ऑलिम्पिकमध्ये मेरीने फ्लायवेट (51 किलो गट) लढतीत कांस्यपदक मिळवले होते. 2016 मध्ये भारताचे सन्मानीय राष्ट्रपती यांनी मेरीची संसदेच्या वरिष्ठ सभागृहात, राज्यसभेकरता मेरीची खासदार म्हणून नियुक्ती केली होती.
नुकत्याच पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सिंधूनं जेतेपद पटकावले. तिने जपानच्या नोझोमी ओकुहाराला नमवून सुवर्णपदक नावावर केले. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्मपदक जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. या विजयासह सिंधूने 2017च्या जागतिक स्पर्धेतील अंतिम फेरीतील पराभवाची परतफेड केली. या स्पर्धेत सिंधूच्या नावे आता एक सुवर्ण, दोन रौप्य व दोन कांस्य अशी पाच पदकं झाली आहेत.